IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi News : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तू फिट बसत नाही, असे ज्यांनी लोकेश राहुलला ( KL Rahul) हिणवले होते. त्यांच्यावर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ पाहताना तोंड लपवण्याची वेळ आलेली दिसतेय. कर्णधारपदाचं ओझं पुन्हा न घेता एक प्रॉपर फलंदाज म्हणून तो आयपीएल २०२५ गाजवतोय. त्याने आज गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आणि शतक झळकावले.
गुजरातने ११ सामन्यांत १६ गुण कमावले आहेत, तर दिल्लीला ११ सामन्यांत १३ गुण जिंकता आले आहेत. त्यांना उर्वरित तिन्ही सामने जिंकून १९ गुणांसह प्ले ऑफमध्ये स्थान पटकावता येणार आहे. त्यामुळे दिल्लीसाठी प्रत्येक सामना करो वा मरो असाच आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शद खानने चौथ्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला ( ५) बाद केले. लोकेश राहुलने दिल्लीचा डाव चांगला सावरला.
लोकेशने ३३ धावा पूर्ण करताच तो ट्वेंटी-२०त सर्वात कमी इनिंग्जमध्ये ८००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याने २१४ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना विराट कोहलीचा ( २४३ इनिंग्ज) विक्रम मोडला. रलोकेशने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. लोकेश व अभिषेक पोरेल यांनी गुजरातच्या गोलंदाजांना चोपले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९० धावा जोडल्या. १२व्या षटकात साई किशोरने ही जोडी तोडली. पोरेल १९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३० धावा करून माघारी परतला.
पण, लोकेशने साईच्या पुढील षटकात सलग तीन चौकार खेचून त्याला जमिनीवर आणले. लोकेशची फटकेबाजी पाहण्यासारखी होती आणि त्याने आजच्या खेळीसह ऑरेंज कॅप स्वतःकडे आणली. DC कर्णधार अक्षर पटेलही एक पाऊल मागे हटायला मागत नव्हता आणि त्यानेही सुरेख फटकेबाजी केली. राशीदच्या ४ षटकांत ३२ धावा चोपल्या गेल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. पर्पल कॅपचा मानकरी प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीवर पुन्हा आणण्याचा डाव यशस्वी ठरला आणि अक्षर २५ ( १६ चेंडू) धावांवर झेलबाद झाला. लोकेशसोबत त्याची २६ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी तुटली.
लोकेशने पाचवे शतक झळकावून शुभमन गिलच्या ४ शतकाचा विक्रम मोडला. विराट कोहली ( ८), जॉस बटरल ( ७) व ख्रिस गेल ( ६) हे आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज आहे. लोकेशने ६० चेंडूंत त्याचे पाचवे शतक शतक झळकावले होते. आयपीएल इतिहासातील हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने तीन फ्रँचायझीसाठी शतक ठोकले आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्स व लखनौ सुपर जायंट्सकडून शतक पूर्ण केले होते.