प्राप्तिकर विवरणपत्र कोणी भरावे?
esakal May 19, 2025 09:45 AM

डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए

सध्या करदात्यांची प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, अनेक करदात्यांमध्ये एक चुकीचा समज आहे, की उत्पन्नातून कायदेशीर वजावट घेतल्यानंतर उत्पन्न करपात्र होत नसेल, तर विवरणपत्र भरण्याची गरज नाही. मात्र, करपात्र उत्पन्न नसले किंवा कर भरावा लागत नसला, तरीही प्राप्तिकर विवरणपत्र भरणे महत्त्वाचे आहे.

करपात्र मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न

प्राप्तिकर कायद्यात दोन प्रकारच्या करप्रणाली सध्या प्रचलित आहेत. जुन्या करप्रणालीमध्ये करपात्र उत्पन्नाची मर्यादा सर्वसामान्य करदात्यासाठी २.५० लाख रुपये, ज्येष्ठ नागरिक (६० ते ८० वर्षे) यांच्यासाठी तीन लाख रुपये, अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांपेक्षा अधिक वय) यांच्यासाठी पाच लाख रुपये आहे. या करदात्यांचे करपात्र उत्पन्न कलम १०(३८), १०ए, १०बी, १०बीए, कलम ५४, ५४बी, ५४डी, ५४इसी, ५४एफ़,, ५४जी, ५४जीए व ५४जीबी, तसेच कलम ८० मधील जवळजवळ सर्व पोटकलमातील वजावटी विचारात घेतल्यानंतर करपात्र मर्यादेपेक्षा कमी झाल्यानंतरही त्यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी (आकारणी वर्ष २०२५-२६) विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. हाच नियम नव्या करप्रणालीतही काही नाममात्र वजावटीसह लागू आहे.

करसवलत

करसवलत मिळविणे हा करदात्याचा अधिकार आहे. परंतु, ती विवरणपत्र भरल्याखेरीज मिळत नाही. उशिरा दाखल केलेल्या विवरणपत्रातदेखील ही सवलत मिळणे हा करदात्याचा हक्क आहे. उशीरा विवरणपत्र भरल्यास कलम २३४एफ अंतर्गत विलंब शुल्क लागू शकते. करसवलत विचारात घेऊन करपात्र उत्पन्न नसल्यासही विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.

अधिसूचना ३७/२०२२

खालील परिस्थितीत उत्पन्न करपात्र नसले, तरीही विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

अ. कोणत्याही करदात्याची गेल्या आर्थिक वर्षात व्यापार-धंद्यातील एकूण विक्री, उलाढाल किंवा ढोबळ जमा रक्कम साठ लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्यास;

ब. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट आदींचे गेल्या आर्थिक वर्षातील एकूण ढोबळ उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्यास;

क. कोणत्याही करदात्याची गेल्या आर्थिक वर्षात स्रोतावरील करकपात (टीडीएस) आणि स्रोतावर गोळा केलेल्या कराची (टीसीएस) रक्कम सर्वसाधारण व्यक्तीसाठी पंचवीस हजार रुपये (ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,०००) किंवा त्याहून अधिक झाल्यास;

ड. गेल्या आर्थिक वर्षात व्यक्तीच्या एका किंवा अधिक बचत बँक खात्यात जमा झालेली एकूण रक्कम पन्नास लाख रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास.

प्राप्तिकर कायदा कलम १३९(२)(ब)

अ. गेल्या आर्थिक वर्षात व्यक्तीच्या एका किंवा अधिक चालू बँक खात्यात जमा झालेली एकूण रक्कम शंभर लाख रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास; (हा नियम पोस्टातील खात्यांमधील रकमेसाठी लागू नाही)

ब. तुम्ही स्वतःसाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी परदेशी प्रवासावर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली असल्यास;

क. करदात्याचा वार्षिक वीज खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास.

परदेशातून उत्पन्न मिळणारे निवासी करदाते

करदात्यास परदेशातून मालमत्तेतून उत्पन्न मिळत असेल वा भारतात, व्यक्तीस कर उद्देशांसाठी निवासी मानले जात असेल व करदात्याचे परदेशातील मालमत्तेत मालकीहक्क किंवा हितसंबंध असतील, तर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. यात त्याच्या मालकीच्या किंवा लाभार्थी म्हणून मिळालेल्या मालमत्तेचा समावेश आहे. भारताबाहेरील बँक खात्यासाठी करदाता स्वाक्षरीकर्ता असला, तरीही विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.

कंपनी, फर्म

कंपनी, भागीदारी फर्म, विद्यापीठ, कलम ३५(i)(ii) अंतर्गत उद्धृत महाविद्यालये, संशोधन संस्था, न्यूज एजन्सी, कलम १०(२३) अंतर्गत कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था, रुग्णालये, इतर संस्था; तसेच व्यापारी न्यास, ट्रेड युनियन अशा स्वरूपाच्या संस्थांना उत्पन्न असले-नसले, तरी विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

इतर

करदात्यास व्याज वा लाभांश मिळताना करकपात झाली असेल आणि त्याचा परतावा मागण्यासाठी; तसेच व्यवसायातील तोटा पुढे ओढण्यासाठी विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. बँकेतून कर्ज काढायचे असेल किंवा व्हिसासाठी अर्ज करायचा असेल किंवा अपघाताची नुकसान भरपाई मागायची असेल किंवा क्रिमी लेयर वा सरकारी योजनांच्या लाभासाठी उत्पन्नाचा खात्रीशीर पुरावा म्हणून विवरणपत्र अधिकृत मानले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.