मी मराठी नाहीये म्हणून लोकांनी ईशाला... 'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेनाने सांगितला तो अनुभव, म्हणाला, 'एक फोटो...'
esakal May 20, 2025 12:45 AM

छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली मालिका 'काहे दिया परदेस' मधून दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एक होती अभिनेत्री सायली संजीव आणि दुसरा होता अभिनेता ऋषी सक्सेना. या मालिकेचा पहिला प्रोमो येताच प्रेक्षकांच्या नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या. या मालिकेत त्यांनी शिव आणि गौरीची भूमिका साकारलेली. मराठी घरातील गौरी ही उत्तरप्रदेशमधील एका घरात लग्न करून जाते, अशी या मालिकेची संकल्पना होती. ही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. आता ऋषीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या भूमिकेबद्दल सांगितलं. सोबतच त्याच्या आणि ईशाच्या नात्याबद्दलही तो बोलला आहे.

कशी मिळाली शिवची भूमिका

ऋषीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना तो म्हणाला, 'मी आधी छोटी छोटी कामं करत होतो. एका मित्राला फोन केला की कुठे ऑडिशन आहे का, तर त्याने सांगितलं मराठी मालिका आहे पण हिंदी माणूस शोधतायत. तू जा. तेव्हा ठाऊक नव्हतं की मुख्य भूमिका करायचीय. ऑडिशनच्या शेवटच्या दिवशी मी तिथे पोहोचलो आणि सगळ्यात शेवटी माझी ऑडिशन झाली. तिथे निर्माते होते आणि त्यांना माझा अभिनय आवडला. तिथे मी त्यांना विचारलं कोणती भूमिका आहे? तर म्हणाले लीड आहे बेटा लीड आहे. मी तर शॉक झालो.'

ईशा झालेली ट्रोल

एक वेळ अशी होती जेव्हा माझ्याकडे आणि ईशाकडे काम नव्हतं. दीड वर्ष आम्ही कामाशिवाय होतो. तो वेळ शक्यतो करोनामध्ये गेला. तेव्हा आम्ही रोज फक्त उठायचो ब्रेड बनवायचो, खायचो आणि झोपायचो. कारण काम नव्हतं. तेव्हा पैसे पण संपत आलेले. आम्ही परत आपापल्या घरी जाण्याचं ठरवलेलं. त्यातच आम्ही इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ईशा आणि मी एकत्र राहतोय असं सांगितलेलं. त्यावरून आम्ही दोघेही भयंकर ट्रोल झालेलो. प्रचंड म्हणजे प्रचंड. लोकांनी खूप ट्रोल केलेलं. मला ट्रोल केलेलंच पण ईशाला केलेलं कारण मी मराठी नाहीये. पण थोड्या दिवसांनी सगळं ठीक झालं.'

ऋषी लवकरच नव्या चित्रोतातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ईशा सध्या स्टार प्रवाहावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत दिसते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.