वैकुंठधाममध्ये ऑनलाइन अंत्यदर्शन बंद
esakal May 20, 2025 12:45 AM

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १९ : लाखो रुपये खर्च करून मोहनानंद येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत २०११ मध्ये आप्तस्वकीयांच्या अंतिम दर्शनासाठी ऑनलाइन सोय उपलब्ध करून देण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले होते. हे कॅमेरे आणि इतर साधने फक्त वर्ष दीड वर्षातच बंद झाले. आता १३ वर्षे झाली, तरी ही सुविधा कोणत्याही दुरुस्तीविना धूळ खात पडलेली आहे.
बदलापूर पश्चिमेला मोहनानंद नगर येथे २०११मध्ये साधारण ६० लाख रुपये खर्च करून तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या कार्यकाळात वैकुंठधाम स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. या वेळी मुंबईच्या धर्तीवर स्मशानभूमीत कॅमेरे बसवण्यात आले. घरातील एखादी व्यक्ती मरण पावली तर लांबचे नातेवाइक, महिला, ज्येष्ठ आणि आजारी माणसे आप्तस्वकीयांच्या अंतिम विधीला येऊ शकत नाहीत. त्यांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने अंतिम दर्शन पाहण्याची सुविधा या कॅमेऱ्याद्वारे देण्यात आली. यासाठी लाखो रुपये खर्चून या ठिकाणी कॅमेरे आणि इंटरनेट सेवा जोडण्यात आली. ही सुविधा पुढे जवळपास वर्षभरातच बंद पडली. त्यावर अनेकदा दुरुस्तीची मागणी करत काही वेळा तात्पुरती सेवा सुरू झाली; मात्र दीड एक वर्षात ही सेवा पूर्ण बंदच झाली. आज ही सेवा बंद होऊन १३ वर्षांचा काळ लोटला. त्यात येथील कॅमेरे आणि इतर साहित्य चोरीला जाऊन काही सामान भंगारात जाईल, या अवस्थेत आहे. लाखोंचा खर्च करून सुरू केलेल्या या ऑनलाइन अंतिम दर्शन सुविधेचे तीनतेरा वाजले आहे.

२०११मध्ये ऑनलाइन अंतिम दर्शन सेवा सुरू झाली; मात्र लोकांपर्यंत ही सुविधा आणि माहिती पोहोचायच्या आतच सेवा बंद झाली. त्यामुळे याचा लाभ बदलापूरकरांना घेता आलाच नाही. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे समोर येत आहे.
- तुषार साटपे, सामाजिक कार्यकर्ते

अनेक वर्षांपासून ही सुविधा बंद अवस्थेत आहे. मी येण्यापूर्वी डागडुजी झाली की नाही माहीत नाही. २०२३ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून अद्याप कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. लवकरच या संदर्भात पाहणी करून आवश्यक असलेली साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, निविदा काढून हे काम पूर्ण केले जाईल. लवकरच बदलापूरकरांसाठी ऑनलाइन अंतिम दर्शन सुविधा उपलब्ध होईल.
- अभिजित ताम्हाणे, अधिकारी विद्युत विभाग,
कुळगाव बदलापूर नगर परिषद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.