Operation Sindoor : पावसात तिरंगा यात्रा, ऑपरेशन सिंदुरला सलाम
esakal May 20, 2025 03:45 AM

शिरूर : ऑपरेशन सिंदुर मार्फत भारतीय सैन्यदलाने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव आणि कठीण परिस्थितीत भारतीय नागरीकांच्या मनात देशभक्तीची भावना रूजविण्याच्या उद्देशाने शहरातून आज भर पावसात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय जवान जय किसान म' चा गजर करीत निघालेल्या या पदयात्रेत सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि सर्वधर्मिय नागरीक, महिला तिरंगी झेंडे घेऊन सहभागी झाले होते.

शिरूर बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवरायांच्या जयजयकाराबरोबरच 'भारत माता की जय' च्या घोषणांनी तरूणांनी परिसर दणाणून सोडला. माजी सैनिकांनी या पदयात्रेचे शिस्तबद्ध संचलन केले. दिल्लीतील अमर जवान स्मारकाची प्रतिकृती अग्रभागी ठेवत निघालेल्या या पदयात्रेत अबालवृद्ध तिरंगी झेंडे व भारतीय सैनिकांच्या गुणगौरवपर फलक घेऊन सहभागी झाले होते. 'धर्म पूछकर सिंदूर मिटाया, वही सिंदूर बारूद बनकर बरसाया', या आशयाचे महिलांनी घेतलेले फलक लक्षवेधी ठरले. येथील हुतात्मा स्तंभाजवळ रॅली आल्यानंतर भारत माता की जय चा गजर टीपेला पोचला. शिरूर तालुका माजी सैनिक संघटनेचे सल्लागार बापूसाहेब कोहकडे यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यंटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

पाकिस्तान ला बेचिराख करण्याची धमक भारतीय सैन्यात असून, भारतीय लष्कराची ताकद या निमीत्ताने जगाने अनुभवली असल्याचे निवृत्त कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही तर स्थगित केलेले आहे. आपल्या सैन्याची दखल विश्वपातळीवर घेतली गेली आहे., असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून सेवा बजावलेले विठ्ठलराव वराळ यांनी यावेळी भारतीय सैन्यदलाचा गौरव केला. चीन, पाकीस्तान यांच्यात आता कुरापती काढण्याची हिंमत राहिलेली नाही. कारण त्यांनी हा बदललेला भारत अनुभवला असल्याचे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांनी रॅलीमागील भूमिका विषद केली. देशप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रूजावी यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूर मार्फत भारतीय सैन्यदलाने केलेल्या अद्वितीय शौर्याच्या गौरवार्थ ही पदयात्रा काढल्याचे ते म्हणाले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, भाजप उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ मांढरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष हाफीज बागवान यांनीही मनोगतात अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा व पाकीस्तानच्या छूप्या कारवायांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. उमेश शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.