भारत आणि पाकिस्तान या दोन देशात काही दिवसांपूर्वी युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत देण्यात आले होते.
त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावाच्या काळात आयपीएल २०२५ स्पर्धाही ९ मे रोजी स्थगित करण्यात आली होती.
पण, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धेला पुन्हा ८ दिवसांनी १७ मे रोजी सुरुवात झाली.
पुन्हा आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर भारतीय सैन्याप्रती आदर मैदानात राष्ट्रगीत वाजवून व्यक्तही करण्यात आला.
दरम्यान, १८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघातील सामन्यादरम्यान भारतीय सैन्याच्याप्रती आदर व्यक्त करणारं 'जय हिंद' लिहिलेलं पोस्टरही स्टेडियममध्ये झळकलं.
याचा फोटो गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्याने त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने अनेकांची मनं जिंकली.
गिलने कॅप्शनमध्ये लिहिले, 'क्रिकेट जरी परतलं असलं, तरी खरे योद्ध्यांनी त्यांची पोस्ट सोडलेली नाही. आपल्या सैन्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, जय हिंद.'