पुणे - पुढच्या महिन्यात पुणे शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होऊन त्यांचा शहरात मुक्काम असणार आहे. या दोन्ही संतांच्या पालखी मार्गावरील सोई सुविधा, स्वच्छता, रस्ता, सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाहणी केली.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवणे, रस्त्यावरील अतिक्रमणे, बेवारस वाहने काढणे, ठिकठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, पाणी पुरवठा, विद्युत, आरोग्य सुविधा देण्याचे आदेश भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे.
अतिरिक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख, उपायुक्त अविनाश सकपाळ आदी यावेळी उपस्थित होत. आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर पुढील प्रमाणे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी दिलेले निर्देश
- पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्ष उभारावे.
- या कक्षांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, स्वच्छतागृह, इमर्जन्सी मेडिकल युनिट यांची सुविधा असावी
- वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी फिरते दवाखाने आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था उपलब्ध असावी.
- वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत समन्वय ठेवा, दिंडी सोहळ्याला वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्या
- पथ विभागामार्फत पदपथ व रस्त्यांची डागडुजी, तसेच रस्त्यालगतच्या सिमाभिंतींचे रंगकाम करावे.
- पालखी मार्गातील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करा.
- विसाव्याच्या ठिकाणी प्रसाद वाटप करताना गर्दी होऊन आपत्ती होऊ नये यासाठी अग्निशमन सुविधांची उपलब्धता असावी.
- पाणीपुरवठा विभागाने पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करावा.
- देखभाल आणि दुरुस्तीसाठी २४ तास कार्यरत यंत्रणा तैनात करावी.
- पालखी मुक्काम स्थळांवरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती लवकर पूर्ण करावी.
- महापालिका शाळांमध्ये मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांसाठी पाणीपुरवठा व पुरेशी शौचालये उपलब्ध करून द्या
- आरोग्य विभागाने पालखी मार्गावर तसेच शाळांमध्ये औषध व धूर फवारणी करावी
- वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी २४ तास स्वच्छता राखण्यात यावी.
- घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याचे आदेश
- पालखी पुण्यात मुक्कामी असताना विद्युत व्यवस्था खंडित होणार नाही याबाबत संबंधितांना सूचना