Chhagan Bhujbal's Oath Ceremony on Tuesday
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ मंगळवारी (२० मे) राजभवनावर शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळात फिरत आहे. उद्या सकाळी १० वाजता मुंबईतील राजभवन येथे शपथविधी सोहळा होणार असल्याचे वृत्त आहे. भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. त्यांना अपेक्षित महत्त्व न मिळाल्यामुळे त्यांनी अनेकदा असंतोष व्यक्त केला होता. आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांना मंत्रिमंडळात सामील केलं जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या हाती धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं खाते सोपवलं जाऊ शकतं, अशी चर्चाही रंगली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज होते आणि मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. आता त्यांना मंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांनी त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. आधीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं. नंतर ते खातं धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं. आता तेच खातं पुन्हा एकदा भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. पण, भुजबळांंचे मंत्रिमंडळात पुनरागमन मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. छगन भुजबळांच्या या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.