IPL 2025 Sunrisers Hyderabad beat : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंतला ताफ्यात घेतल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सला खूप अपेक्षा होती. पण, संजीव गोएंका यांचे २७ कोटी पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले. रिषभचा फॉर्म चांगला राहिला नाहीच, शिवाय त्याच्या नेतृत्व कौशल्यही काही खास दिसले नाही. LSG चे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबादने २०६ धावांचे लक्ष्य सहज पार केले.
ट्रॅव्हिस हेडच्या अनुपस्थितीत मैदानावर आलेल्या अथर्व तायडेला ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी जावे लागले. पण, इशान किशन व अभिषेक शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेडूंत ८२ धावा चोपून सामना एकतर्फी केला. अभिषेकने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे LSG विरुद्धचे त्याचे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. ट्रॅव्हिस हेडने मागील पर्वात १६ चेंडूंत फिफ्टी पूर्ण केली होती. याच हंगामात अभिषेकने आधीच्या लढतीत १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
तो २० चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. त्यानंतर इशान किशनही ( ३५) त्रिफळाचीत झाला. या दोघांना दिग्वेश राठीने बाद केले. अभिषेक व राठी यांच्यात भांडणही झालेले पाहायला मिळाले. हेनरिच क्लासेन व कमिंदू मेंडिस यांनी हैदराबादची खिंड लढवली. या दोघांनी चा विजय पक्का केला. हैदराबादने ६ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. क्लासेनने २८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ४७ धावा केल्या. विजयासाठी ९ धावा हव्या असताना कमिंदू मेंडिसला ( ३२) दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. हैदराबादने १८.२ षटकांत ४ बाद २०६ धावा करून विजय मिळवला.
लखनौचे १२ सामन्यांत फक्त १० गुण झाले आहेत आणि उर्वरित दोन सामने जिंकूनही ते १४ गुणांपर्यंतच पोहचू शकतात आणि त्यांना प्ले ऑफमध्ये पोहचणे अवघड झाले आहे. आता मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चौथ्या स्थानासाठी थेट लढत आहेत.
ऑतत्पूर्वी, मिचेल मार्श ( ६५) व एडन मार्करम ( ६१) यांच्या ११५ धावांच्या सलामीनंतर लखनौचा डाव काहीसा संथ झाला होता, परंतु निकोलस पूरनने ( ४५) शेवटच्या षटकात चांगला खेळ करून संघाला ७ बाद २०५ धावांपर्यंत पोहोचवले.