पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात २१ ते २५ मे या कालावधीत आनंदयात्री करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पाचदिवसीय स्पर्धेत विविध नाट्यसंस्था आणि नवोदित कलाकार कला सादर करणार असून, प्रेक्षकांना दर्जेदार एकांकिकांचा आनंद घेता येणार आहे. या एकांकिका स्पर्धा बघण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारी ही स्पर्धा नाट्यरसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
राम चिंचलीकर आणि शुभदा ताकभाते संचलित समूह आनंदयात्रीच्या वतीने आनंदयात्री करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (ता. २१) सकाळी ८ वाजता होणार असून, या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे उपस्थित राहणार आहेत. २१ ते २५ मे या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत या एकांकिका स्पर्धा होणार आहेत. आनंदयात्री फेसबुक समूह हे मराठी नाट्य आणि सांस्कृतिक तसेच क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणारे एक व्यासपीठ आहे. या समूहाने आयोजित केलेली ही एकांकिका स्पर्धा नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी देण्यासाठी ओळखली जाते. सलग चार वर्षे आनंदयात्री समूहातर्फे एकांकिका स्पर्धा भरविल्या जात आहेत.
---------------------
पाच दिवसांत ३७ एकांकिका
यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकांकिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवर आधारित कथानक मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक एकांकिकेला ४५ ते ६० मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. यामध्ये संगीत, प्रकाश योजना आणि नेपथ्य यांचा उत्कृष्ट वापर अपेक्षित आहे. या स्पर्धेत ठाणे, पुणे, मुंबई, मुंबई पश्चिम, विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर आणि बंगळूर या भागातील एकूण ३७ एकांकिका पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
----------------
दोन लाखांचे बक्षीस व वैयक्तिक पुरस्कार
चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेत दररोज आठ ते नऊ एकांकिका सादर केल्या जातील. एकांकिका स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत विजेत्या एकांकिकांची घोषणा आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. विजेत्यांना दोन लाख चार हजार रुपये रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, नेपथ्य आणि प्रकाशयोजना यांसारख्या विविध विभागांसाठी वैयक्तिक पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत.