…मी वाचन सोडलं, राऊतांच्या पुस्तकाबाबत विचारताच प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
GH News May 20, 2025 08:10 PM

ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे काही दिवसांपूर्वी प्रकाशन झाले. प्रकाशनाआधीपासूनच या पुस्तकाची फार चर्चा होती. आता प्रत्यक्ष प्रकाशनानंतर या पुस्तकात राऊत यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपा तसेच शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राऊतांवर या पुस्तकावरून सडकून टीका केली आहे. असे असतानाच आता या पुस्तकावर बोलताना वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ते धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांनी केली खोचक टिप्पणी

संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर प्रकाश आंबेडकरांनी अवघ्या दोन ओळींत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी पुस्तक लिहिलं म्हटल्यावर प्रकाश आंबेडकरांनी मी वाचन सोडून दिल्याची खोचक टिप्पणी केलीय. दरम्यान, याआधी भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राऊतांच्या पुस्तकाबद्दल विचारल्यावर मी बालसाहित्य वाचत नाही, असा टोला लगावला होता.

संजय राऊतांच्या पुस्तकात नेमकं काय आहे?

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. या कारवाईनंतर राऊतांना काही काळ तुरुंगात काढवे लागले होते. याच तुरुंगातील अनुभवांविषयी माहिती देणारी तसेच सरकारकडून विरोधकांवर कशा पद्धतीने सूडभावनेने कारवाई केली जाते, हे सांगणारी वेगवेगळी प्रकरणं या पुस्तकात आहेत. राऊतांनी तुरुंगातील कटू अनुभवही या पुस्तकात सांगितले आहे.

… ओबीसांचा फायदा होईल याबात मला शंका

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलंय. छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन झालं त्याबद्दल शुभेच्छा. पण ओबीसींचा काही फायदा होईल याबाबत मला शंका आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना फीस भरायला पैसे नाहीयेत. प्रवेश मिळाला तरी ते ऍडमिशन घेत नाहीत. मंत्रिमंडळात भुजबळ आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कसा मांडतात ते पाहू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वादावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.