IND vs ENG : टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन कोण? हेड कोच गंभीर या तारखेला करणार घोषणा!
GH News May 21, 2025 08:11 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या निवृत्तीनंतर टीम मॅनेजमेंटसमोर कर्णधार कुणाला करायचं? हे सर्वात मोठं आव्हान होतं. आता रोहितच्या निवृत्तीला बरेच दिवस झाले आहेत. टीम मॅनेजमेंटने या गेल्या काही दिवसात रोहितनंतर कुणाला कर्णधार करायचं हे निश्चित केल्याचं म्हटंल जात आहे. त्यानंतर आता टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. हेड कोच गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर नव्या कसोटी कर्णधाराचं नाव जाहीर करणार आहेत. गंभीर आणि आगरकर दोघेही पत्रकार परिषदेतून टीम इंडियाचा कॅप्टन कोण असणार? हे सांगणार आहेत.

घोषणा केव्हा होणार?

आता नव्या कर्णधाराचं नाव कोणत्या तारखेला जाहीर होणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी 24 मे रोजी टीम इंडियाचा नव्या टेस्ट कॅप्टनचं नाव घोषित केलं जाणार आहे. कर्णधार म्हणून शुबमन गिल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या तिघांच्या नावाची चर्चा आहे. मात्र शुबमन गिल याचं नाव आघाडीवर आहे.

कर्णधार कुणाला करायचं? यावरुन दिग्गजांमध्ये अनेक मतं पाहायला मिळत आहे. काही दिग्गज क्रिकेटर शुबमन गिल याला कर्णधार करा, असं म्हणत आहेत. तर अनुभवाच्या निकषानुसार जसप्रीत बुमराह याला नेतृत्वाची धुरा द्यायला हवी, असं काहींच म्हणणं आहे. तसेच ऋषभ पंत याच्या नावाचीही चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र आता टीम मॅनेजमेंट कुणावर विश्वास दाखवते? हे काही दिवसांनी स्पष्ट होईल.

इंडिया-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले

दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, बर्मिंगघम

तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लंडन

चौथा सामना, 23 ते 27 जुलै, मँचेस्टर

पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, लंडन

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

दरम्यान टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या अनुभवी खेळाडूंशिवाय कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.