11th Class Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात, नवी तारीख आली समोर!
GH News May 23, 2025 12:08 AM

11th Class Admission Process : राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत राबवली जात आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या संकेतस्थळावरून प्रवेश अर्जाची प्रक्रिया करावी लागते, तेच पोर्टल बंद पडल्याचे समोर आले आहे. असे असताना इयत्ता अकरावीसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 मेपासून चालू

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 26 मे रोजीपासून इयत्ता अकरावीच्या परीक्षेसाठीचे पोर्टल चालू होणार आहे. सकाली अकरा वाजल्यापासून या पोर्टलवर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. तसं पाहायचं झालं तर 21 मे रोजीपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली होती. मात्र हे पोर्टलच बंद असल्याने विद्यार्थी तसेच पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 मेपासून चालू होईल, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.

क्षण मंत्रालय प्रवेश देण्यास नापास- गांगुर्डे

या सर्व भोंगळ कारभारावर मनविसेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग चालू झाली आहे. पुढील शिक्षणासाठी सर्वोत्तम महाविद्यालय कसे मिळेल? यासाठी विद्यार्थ्यांची धडपड चालू आहे. दुसरीकडे मात्र दहावीला (SSC) लाखो विद्यार्थी पास/उत्तीर्ण झाले असताना देखील त्यांच्या अकरावीच्या /FYJC प्रवेशासाठी शासनाचे शालेय शिक्षण मंत्रालय प्रवेश देण्यास नापास ठरले आहे. दहावीचा निकाल लवकर लागूनसुद्धा वारंवार तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना तसेच पालकांना प्रवेशाचा अर्ज भरता येत नाहीये, अशी संतप्त प्रतिक्रिया गांगुर्डे यांनी व्यक्त केली.

इयत्ता अकरावीचे वर्ग कधीपासून चालू होणार?

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक शासन निर्णय जारी केला होता. 6 मे रोजी जारी केलेल्या या निर्णयानुसार इयत्ता अकरावीचे वर्ग 11 ऑगस्टपासून चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश फार उशिराने होतो. त्यामुळे 11 ऑगस्टपूर्वी अकरावीचे वर्ग चालू करण्याची मुभा यावेळी शिक्षण विभागाने दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.