Kishtwar Encounter : जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, चकमकीत २ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
esakal May 23, 2025 12:45 AM

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मोहिमेत एक जवान शहीद झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल छत्रूतील शिंगपोरा परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत होते. तेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार केला गेला. यात गंभीर जखमी झालेला जवान उपचारावेळी शहीद झाला. संदीप गायकवाड असं जवानाचं नाव असून ते अहिल्यानगर जिल्ह्यातील होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे सुपुत्र जवान संदीप गायकर हे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झाले. गायकर हे मूळचे करंडी गावचे रहिवासी होते. अवघ्या ९ महिन्यांपूर्वीच ते लष्करात मराठा आरआर बटालियनमध्ये दाखल झाले होते.

भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कोअरने सोशल मीडियावर चकमकीची माहिती दिलीय. त्यात एक जवान शहीद झाल्याचं सांगितलं. गुरुवारी सकाळी किश्तवाडच्या छत्रू इथं पोलिसांसोबत संयुक्त मोहिम राबवत होते. त्यावेळी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. अजूनही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला होता. पण उपचारावेळी त्याला वीरमरण आलं असं व्हाइट नाइट कोअरने सांगितलंय.

किश्तवाडमध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या दोन पॅरा एसएफ, ११ आरआर आणि सातवी आसाम रायफल आणि एसओजी यांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहिम राबवली. सिंहपोरा चटरू इथं पथकांकडून शोध सुरू होता. त्यावेळी जोरदार चकमक झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. चार दहशतवाद्यांच्या एका गटाला सुरक्षा दलांनी घेरलं आहे. परिसरात अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चकमकीच्या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आलेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.