बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आपण संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत, पॅनेलमध्ये फक्त राष्ट्रवादीचेच उमेदवार नसतील तर जे संचालक होण्यास पात्र आहेत, अशांचाही विचार केला जाईल, 13 जून रोजी प्रचाराचा प्रारंभ करताना कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या नावाचीही घोषणा केली जाईल, कारखाना सर्वोत्तम पध्दतीने चालविण्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माझ्या हातात जे जे काही आहे, त्या सर्वच यंत्रणाचा वापर करत मी ही निवडणूक लढणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी आज ही निवडणूक त्यांनी कमालीच्या प्रतिष्ठेची केलेली असल्याचे सूतोवाच केले. ब-यापैकी नवीन चेह-यांना संधी देण्याचेही त्यांनी जाहीर केले. या निवडणूकीत मीही लढणार आहे, मलाही एकदा बघायचच आहे की काय होतय ते, अस म्हणत आपण या लढतीसाठी दंड थोपटल्याचेच त्यांनी जाहीर केले.
तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बुधवारी (ता. 21) जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 22) मेळाव्याचे आयोजन केले होते. या मध्ये समझोता होईल, चंद्रराव तावरे व अजित पवार युती करतील अशी शक्यता वर्तविली जात होती, प्रत्यक्षात मात्र अजित पवार यांनी अशा सगळ्या शक्यता फेटाळून लावत थेटपणे ताकदीनिशी निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
नामोल्लेख टाळत अजित पवार यांनी आज चंद्रराव तावरे यांच्यावर आपल्या शैलीत जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, ते हट्टी असतील तर मीही डबल हट्टी आहे, आपल्या वयाचा विचार करुन नवीन युवकांना संधी द्यायला हवी, इतक्या वर्ष तुम्ही काम केलेलेच आहे, आता नव्या चेह-यांनाही काम करु द्यायला हवे. यांना कारखान्याविषयी खरच आपुलकी असती तर काही जण अडीच वर्षे तर काही जण पाच वर्षे बोर्ड मिटींगला फिरकलेही नाही, असे का घडले. काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सांगतात, मीही मुख्यमंत्र्यांना सांगेन मी तुमच्या मतदारसंघात लक्ष घालतो का, तुम्ही माझ्या मतदारसंघात लक्ष घातले तर मलाही तुमच्या भागात लक्ष घालावे लागेल. शेवटी कितीही काहीही झाले तरी बारामती हा पवारसाहेब व माझा मतदारसंघ म्हणून देशाला माहिती आहे. आम्ही महायुती म्हणून कार्यरत आहोत, त्या मुळे तीही काळजी कार्यकर्त्यांनी करु नये.
माझ्या पॅनेलमध्ये सर्वपक्षीय ताकदीचे उमेदवार असतील, जे योग्य असतील त्यांनाही मी सामावून घेईन पण कारखान्याच्या स्थापनेपासून चालला नाही असा कारखाना येत्या पाच वर्षात मी चालवून दाखविणार आहे, हा माझा शब्द आहे. अध्यक्ष व संचालकांना चुकीचे काम करु देणार नाही, मी बारकाईने कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील विकासकामांनाही चालना देणार असून सीएसआरच्या माध्यमातूनही काही विकासकामे मार्गी लावली जातील.
तडाखेबंद भाषणात अनेकांना चिमटे व कोपरखळया...आपल्या तडाखेबंद भाषणात अजित पवार यांनी अनेकांना चिमटे काढत कोपरखळ्या मारल्या. ते म्हणाले, संचालकांना कारखान्याची गाडी वापरु देणार नाही, ज्यांना हे पटणार नाही त्यांनी पॅनेलमध्ये येऊच नका. काही जण माझ्या मागे उद्योग करतात आणि बदनामी माझी होते, त्या मुळे मीच बारकाईने लक्ष घालणार आहे.
मिलिंद संगई बारामती.