Ajit Pawar: वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा संबंध नाही : अजित पवार, आरोपींच्या शोधासाठी सहा पथके पाठवा
esakal May 23, 2025 01:45 AM

बारामती : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वांवर कठोर कारवाईच्या सूचना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना दिलेल्या आहेत, फरारी आरोपींच्या शोधासाठी तीन नाही तर सहा पथके पाठवा असेही सांगितले आहे, संबंधिताची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, या सर्व प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही, तरीही माझी बदनामी केली जात आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत भाष्य केले.

बारामतीत गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी या बाबत सविस्तर भाष्य केले. अजित पवार म्हणाले, काही चॅनेल्सवर या प्रकरणात माझे नाव विनाकारण घेतले जात आहे, त्या लग्नाला मी उपस्थित होतो, त्या वरुन माझा संबंध याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, वास्तविक या सर्व प्रकरणाशी माझा सुतरामही संबंध नाही, तरीही माझी बदनामी चालविली आहे.

या बाबत योग्य त्या तपासाच्या व फरारी आरोपींना लवकर अटक करण्यासाठी पथकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. कोणाच्याही घरी असा प्रसंग घडू नये, संबंधित कार्यकर्त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

राजकीय नेतृत्वाने आपल्या घऱच्या लग्नाला यावे असे अनेकांना वाटते, त्या नुसार या लग्नाला मी गेलो होतो, इतकाच काय तो माझा संबंध आहे, मात्र विनाकारणच माझे नाव चालवून बदनामी केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.