मॉन्सुनपूर्व पावसामुळे
शेतीचे गणित कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ः मॉन्सुनपूर्व पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेतीचे गणित कोलमडले आहे. पेरणीपूर्वी गावागावात केली जाणारी जमिन भाजणीची कामे काहींना करता आलेली नाहीत. यातून अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. आता धुँवाधार पावसाने जमिन ओलीचिंब झाल्याने भाजणी करण्याची कामे होणार नाहीत.
ग्रामीण भागात आजही पारंपारिक पध्दतीने भातशेती केली जाते. साधारणतः होळी पौर्णिमा झाल्यानंतर झाडांची छाटणी करण्याचे काम सुरू होते. आसपासच्या झाडांची गळून पडलेली पाने, अन्य जळावू साहित्य भातशेती जमिनीत पसरवून जमिन भाजणी (ग्रामीण भाषेत भाजावळ) केली जाते. यामुळे शेतातील तणांचे प्रमाण कमी होते असा पूर्वांपार रिवाज आहे. जमिन भाजणी करून झाल्यानंतर भात नांगरणी करून पेरणीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी असतो. मात्र, यावेळी अवेळी आलेल्या मान्सुनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे शेतीचे गणित कोलमडले आहे. अचानक पाऊस आल्याने काहींना भाजावळ करण्याची संधी मिळालेली नाही. त्यातच जमिन नांगरणीची कामेही झालेली नाहीत. आता मान्सुनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे भातशेती जमिनीत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे आता जमिन भाजावळीची कामे करता येणार नाहीत. खोलगट भागातील भातशेती जमिनीत साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा होईपर्यंत पेरणी करण्यामध्येही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मान्सुनपूर्व पाऊस एकीकडे भात पेरणीसाठी पोषक ठरण्याची शक्यता असली तरीही भाजावळ आदी कामे रखडली आहेत.