GT vs LSG Live: 10 Fours, 6 Sixes! मिचेल मार्शचे विक्रमी शतक; थोरल्या भावाच्या पावलावर पाऊल, राशीदच्या एकाच षटकात २५ धावा
esakal May 23, 2025 05:45 AM

IPL 2025 vs Lucknow Super Giants : मिचेल मार्शने ( MITCHELL MARSH ) सातत्य दाखवताना इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील सहावी ५०+ धावांची खेळी केली. त्याने राशीद खानच्या एका षटकात ६,४,६,४,४,१ अशा २५ धावा कुटल्या. एडन मार्करमसोबत त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीला ९१ धावांची भागीदारी केली आणि गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मिचेल मार्शने वादळी शतक झळकावताना एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. २००८ मध्ये त्याचा मोठा भाऊ शॉन मार्श याने आयपीएलमध्ये शतक झळकावले होते आणि आयपीएल इतिहासात शतक झळकावणारी ही भावांची पहिलीच जोडी ठरली.

लखनौचे सलामीवीर मिचेल मार्श व एडन मार्करम यांना पॉवर प्लेमध्ये GT च्या गोलंदाजांनी रोखून ठेवले होते. गुजरातचा गोलंदाज अर्शद खान दुसऱ्या षटकात दोनवेळा पाय घसरून पडला आणि त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मोहम्मद सिराज चांगला मारा करताना दिसला आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर रिटर्न झेल घेताना त्याच्याही हाताला दुखापत झाली. पण, प्रार्थमिक उपचार घेऊन तो गोलंदाजीला पुन्हा परतला. कागिसो रबाडाने टाकलेल्या सहाव्या षटकात १५ धावा आल्याने ने पॉवर प्लेमध्ये बिनबाद ५३ धावांपर्यंत मजल मारली.

मार्श व मार्कराम यांनी LSG साठी पाचव्यांदा अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्याकडून क्विंटन डी कॉक - लोकेश राहुल यांनी सहा वेळा, तर निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचवेळा अर्धशतकी भागीदारी केली.

सेट झालेल्या फलंदाजांनी धावांची गती वाढवण्यास सुरुवात करताना सुरेख टोलेबाजी केली. मार्शने षटकाराने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे या पर्वातील सहावे अर्धशतक ठरले आणि त्याने लोकेश राहुलशी ( २०२२) बरोबरी केली. साई किशोरने गुजरातला पहिले यश मिळवून दिले. मार्करम २४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३६ धावांवर झेलबाद झाला आणि ९१ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

मार्शने गुजरातची डोकेदुखी वाढवली होती आणि त्याने राशीद खानचे ६,४,६,४, ४, १ असे स्वागत केले. राशीदच्या पहिल्याच षटकात २५ धावा कुटल्या गेल्या. त्यानंतर निकोलस पूरननेही पुढील षटकात राशीदला खणखणीत षटकार खेचला. पूरन व मार्श यांनी १९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना लखनौच्या धावांचा डोंगर उंच केला. मार्शने ५६ चेंडूंत आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत १० चौकार व ६ षटकारांचा समावेश होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.