डायनिंग टेबलची करा सजावट
esakal May 24, 2025 09:45 AM

डायनिंग टेबल हे केवळ जेवणाचे ठिकाण नसून, ते कुटुंब आणि मित्रांच्या एकत्र येण्याचे एक केंद्र असते. मुलांवर संस्कारांपासून सदस्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्याचीही ती जागा असते. योग्य सजावट करून ही जागा अधिक आकर्षक, आरामदायी आणि विशेष बनवता येते. त्यासाठीच्या काही टिप्स बघूया.

टेबलक्लॉथ आणि टेबल रनर्स
  • फॅब्रिक निवड : कॉटन, लिनन किंवा सिल्कसारख्या साहित्यांपैकी निवड करा. पॉलिएस्टर टेबलक्लॉथ सहज स्वच्छ होतात.

  • रंगयोजना : उबदार वातावरणासाठी : तपकिरी, गुलाबी, मरून. फ्रेश लूकसाठी : पांढरा, निळा, पिवळा. फेस्टिव्ह सीझनसाठी : गोल्ड, लाल, हिरवा.

  • रनरचा योग्य वापर : टेबलच्या लांबीपेक्षा सहा-बारा इंच लांब रनर निवडा. ज्यूट किंवा एम्ब्रॉयडरी असलेले रनर्स ट्रेंडी दिसतात.

  • नॅपकिन फोल्डिंग

डायनिंग टेबलवर नॅपकिन फोल्डिंग्जच्या वेगवेगळ्या कल्पना वापरून तुम्ही ते छान सजवू शकता. क्लासिक फोल्ड (चौकोनी फोल्ड करून प्लेटवर ठेवणे), फॅनशेप (नॅपकिन रिंगमध्ये घालून स्टायलिश लूक देणे), थीमॅटिक फोल्डिंग (सणानुसार, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आवडीनुसार हार्ट-शेप किंवा इतर कल्पना) अशा प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.

डायनिंग टेबलच्या मध्यभागाची सजावट नैसर्गिक सजावट
  • लहान फुलदाणीमध्ये गुलाब, लिली किंवा स्थानिक फुले वापरा.

  • लांब टेबलसाठी लिनियर फ्लोरल अरेंजमेंट (फुलांची रांगोळी) करा.

  • तुळशीची पाने, किंवा ओव्याची पाने अशाही गोष्टी वापरून तुम्ही तुमची सजावट रंगतदार करू शकता.

मेणबत्त्या आणि लायटिंग

हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुगंध असलेल्या मेणबत्त्या बाजारात मिळतात. त्यांचा वापर छान पद्धतीनं करता येतो. डायनिंग टेबलचं लायटिंगसुद्धा खास करून तुम्ही तुमचा मूड सुधारू शकता.

मेणबत्त्यांचे प्रकार : फॉर्मल डिनरसाठी पिलर कँडल्स (उंच मेणबत्त्या), रोमँटिक मूडसाठी टी-लाइट्स किंवा फ्लोटिंग कँडल्स.

लायटिंग टिप्स : डिम लाइट्स किंवा एडिसन बल्ब्ज तुम्ही टेबलवर लावू शकता, किंवा स्ट्रिंग लाइट्स टेबलभोवती लटकवू शकता.

थीम-बेस्ड सेंटरपीस
  • बोहो स्टाईल : वूडन ट्रे, फांद्यांच्या प्रतिकृती, मण्यांचे दिवे.

  • मिनिमलिस्ट स्टाईल : एकाच रंगाची वाटी, जिओमेट्रिक स्कल्प्चर.

  • फेस्टिव्ह स्टाईल : दिवाळीसाठी दिवे, ख्रिसमससाठी पाइनकोन्स आणि लाल फुले

खास प्रसंगांसाठी सजावट

वाढदिवस : टेबलच्या मध्यभागी ‘Happy Birthday’ बॅनर लावू शकता, फुगे लावू शकता. लहान मुलांचा वाढदिवस असेल तर कार्टून कॅरेक्टर्स किंवा ग्लिटर प्लेट्स अशा थीम्ड प्लेट्स वापरू शकता.

लग्नाचा वाढदिवस : गुलाबाच्या पाकळ्या, हार्ट-शेप्ड कँडल होल्डर्स यांचा वापर करून रोमँटिक टच देता येतो. पाहुण्यांसाठी नाव कोरलेली प्लेट कार्ड्स वापरता येतात.

सणांसाठीची सजावट : दिव्यांची ओळ, कागदी रांगोळ्या, महिरपी अशा गोष्टींचा वापर करता येतो. ख्रिसमससारख्या सणांसाठी पाइनकोन्स, लाल-हिरव्या रिबन्स, स्नोफ्लेक टेबल रनर अशा गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता.

स्पेस सेव्हिंग आणि स्मार्ट आयडियाज
  • फोल्डिंग टेबल्स : लहान घरांसाठी एक्स्टेंडेबल टेबल्स वापरा.

  • वॉल-माउंटेड टेबल्स : कमी जागेत डायनिंग एरिया तयार करा.

  • मल्टी-फंक्शनल फर्निचर : स्टोरेजसह टेबल्स (ड्रॉवर्स किंवा शेल्फ्स).

वैयक्तिक टच

डायनिंग टेबल या जागेचा वापर करून तुम्ही जेवणाचा प्रसंग अतिशय खास बनवू शकता. त्यासाठी या काही कल्पना तुम्ही वापरू शकता.

  • हस्तलिखित मेनू कार्ड्स : स्पेशल डिनरसाठी मेनू लिहून ठेवा.

  • फोटो फ्रेम्स : ज्या व्यक्तीचा खास दिवस आहे तिचे फोटो टेबलवर ठेवा.

  • म्युझिकल टच : बॅकग्राउंडमध्ये सौम्य संगीत चालू ठेवा.

डायनिंग टेबलची सजावट तुमच्या कल्पकतेवर अवलंबून असते. अतिसजावट करण्यापेक्षा साध्या आणि एलिगंट सजावटीवर भर द्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.