SRH vs KKR: क्लासेनचं वादळी शतक, तर हेडचाही झंझावात; हैदराबाद कोलकाताविरुद्ध पावणे तीनशे पार
esakal May 26, 2025 03:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ६८ वा सामना सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांनी मैदानात दणाणून सोडले.

या दोघांनीही वादळी खेळ करताना संघाला शेवटच्या सामन्यात केलेल्या आक्रमणामुळे संघ सहज २५० पार पोहचला. क्लासेनने तर शतकी खेळी केली. हैदराबादने कोलकातासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हे यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लक्ष्य आहे.

या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांकडून वादळी खेळ पाहायला मिळाला. हैदराबादने २० षटकात ३ बाद २७८ धावा केल्या.

ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे, तर यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे आता आयपीएलमध्ये पहिल्या ४ सर्वोच्च धावसंख्या हैदराबादने केल्या आहेत. तसेच हैदराबादने सर्वाधिक ५ वेळा टी२०मध्ये २५० धावांचा टप्पा पार केला आहे.

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीला आले होते. या दोघांनीही आक्रमक सुरवात केली. नेहमीप्रमाणे अभिषेकने सुरुवातीलाच मोठे फटके खेळले. पण त्याला ७ व्या षटकात १६ चेंडूत ३२ धावा केलेल्या असताना सुनील नरेनने बाद केले.

पण नंतर हेडला हेनरिक क्लासेनची साथ मिळाली. या दोघांनी समोर दिसेल, त्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. हेडने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केली. त्याने पुढेही आक्रमक खेळ केला. क्लासेननही नंतर १७ चेंडूत अर्धशतक केले.

दरम्यान, दोघेही शतक करतील असं वाटत होतं, पण हेडला १३ व्या षटकात नरेनने बाद केले. तोपर्यंत हैदराबादने १७० धावा पार केल्या होत्या. हेडने ४० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली.

पण नंतर इशान किशनने क्लासेनला चांगली साथ दिली. त्याने एक बाजू सांभाळली असताना क्लासेनने आक्रमक केले. त्यामुळे संघाच्या सहज २५० धावा पार झाल्या होत्या.

पण १९ व्या षटकात इशान किशनला २९ धावांवर वैभव अरोराने बाद केले. मात्र क्लासेनने ३७ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.

त्याच्या शतकामुळे हैदराबादने २७८ धावांपर्यंत पोहचली. क्लासेन ३९ चेंडूत १०५ धावांवर नाबाद राहिा. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार मारले. अनिकेत वर्मा ६ चेंडूत १२ धावा करून नाबाद राहिला.

कोलकाताकडून सुनील नरेनने २ विकेट्स घेतल्या, तर वैभव अरोराने १ विकेट घेतली. कोलकाताकडून ४ गोलंदाजांनी ४० हून अधिक धावा खर्च केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.