चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सला ८३ धावांनी पराभूत केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेचा शेवट गोड झाला आहे. कारण चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले होते. यंदाचा हंगाम चेन्नईसाठी खास ठरला नाही.
अनेक चढ-उतार या सामन्यात आले. आधी कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला, तर नंतरही काही खेळाडूंना दुखापतीचा धक्का बसला. पण असे असताना संघात आलेल्या बदली खेळाडूंनी स्पर्धा गाजवली.
यात आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, उर्विल पटेल यांची नावं घेता येतील. या खेळाडूंनी भविष्य उज्वल असल्याचे संकेत चेन्नईला दिले आहेत. चेन्नईसाठी या गोष्टी सकारात्मक असल्या तरी त्यांच्यासाठी यंदाचा हंगाम हा गेल्या १८ वर्षातील सर्वात खराब हंगाम ठरला आहे.
चेन्नईने २०२५ मध्ये १४ सामन्यांमध्ये केवळ चार सामने जिंकले आहेत. तसेच १० सामने पराभूत झाले. चेन्नईने हंगामात चारच सामने जिंकण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी २०२२ मध्ये चेन्नईला ४ सामनेच जिंकता आले होते. पण त्यावेळी संघ ९ व्या क्रमांकावर राहिला होता.
मात्र आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सर्वात तळाच्या क्रमांकावर म्हणजेच १० व्या क्रमांकावर राहिले आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई शेवटच्या स्थानावर राहिले आहेत.
चेन्नईने आयपीएलमध्ये खेळलेल्या १६ हंगामांपैकी १२ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे, यातील ५ वेळा विजेतेपद जिंकले. तसेच केवळ यंदा चौथीच वेळ होती, जेव्हा चेन्नईला प्लेऑफला गाठता आली नाही.
तसेच पहिल्यांदाच सलग दोन हंगामात चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचू शकले नाहीत. गेल्यावर्षी प्लेऑफपासून चेन्नई थोडक्यात दूर राहिले होते. त्यांना ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
चेन्नईची आत्तापर्यंत आयपीएलमधील कामगिरी२००८ - उपविजेते
२००९ - सेमीफायनलिस्ट
२०१० - विजेते
२०११ - विजेते
२०१२- उपविजेते
२०१३ - उपविजेते
२०१४ - उपविजेते
२०१५ - उपविजेते
२०१६ - बंदी
२०१७ - बंदी
२०१८ - विजेते
२०१९ - उपविजेते
२०२० - सातवा क्रमांक
२०२१ - विजेते
२०२२ - नववा क्रमांक
२०२३ - विजेते
२०२४ - पाचवा क्रमांक
२०२५ - दहावा क्रमांक