४ दिवसांत उजनी धरणात ६ टीएमसी पाणी! मुसळधार पावसामुळे धरण झाल्यापासून ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात उजनीची वाढली पाणी पातळी
esakal May 26, 2025 07:45 AM

सोलापूर : उजनी धरण झाल्यापासून मागील ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे धरणात चार दिवसांत सहा टीएमसी (१२ टक्के) पाणी वाढले आहे. गतवर्षी जूनअखेर उणे पातळीत राहिलेले धरण आता मेअखेर प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे.

सोलापूर : उजनी धरण झाल्यापासून मागील ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे धरणात चार दिवसांत सहा टीएमसी (१२ टक्के) पाणी वाढले आहे. गतवर्षी जूनअखेर उणे पातळीत राहिलेले धरण आता मेअखेर प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे.

सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव अशा शहरांबरोबरच पुणे व सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना आणि सोलापूर जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींना उजनी धरणातील पाण्याचा मोठा आधार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर जमिनीला सध्या उजनीतून थेट पाणी मिळते. शेतीसाठी सोडलेल्या दोन आवर्तनामुळे धरणाची पातळी सध्या उणे २३ टक्क्यांपर्यंत पोचली होती. पण, मॉन्सूनपूर्व पावसामुळे उजनी धरणाची पातळी उणे १२ टक्क्यांवर आली आहे. पाऊस असाच आणखी चार-पाच दिवस राहिल्यास धरण मेअखेर प्लसमध्ये (उपयुक्त साठ्यात) येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरणात सध्या दौंडवरून ११ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. याशिवाय भिगवण व उजनी धरण परिसरातूनही १५ हजाराहून अधिक क्युसेकचा विसर्ग धरणात येत आहे. त्यामुळे रविवारी (ता. २५) एका दिवसात धरणात सकाळी सहा ते रात्री १२.३० वाजेपर्यंत धरणात तीन टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणाची वाटचाल उपयुक्त साठ्याकडे सुरू असल्याने तीव्र उन्हाळ्याचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सहा दिवसांतील पाण्याची वाढ

  • २१ मे : उणे २२.९६ टक्के (५१.३६ टीएमसी)

  • २२ मे : उणे २२.३१ टक्के (५१.७१ टीएमसी)

  • २३ मे : उणे २१.४३ टक्के (५२.१८ टीएमसी)

  • २४ मे : उणे १९.४३ टक्के (५३.२५ टीएमसी)

  • २५ मे : उणे १२ टक्के (५७.१९ टीएमसी)

भीमा नदी काठावर सतर्कतेचा इशारा

पाच-सहा दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सध्या नीरा पात्रात लाटे याठिकाणी २७ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. भीमा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पूर्वीचेच पाणी आहे. आता सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्यांवरून पाणी जाईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, पाणी जास्त असल्यास बंधाऱ्यावरून प्रवास टाळावा, असे आवाहन भीमा पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगवले यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.