Monsoon 2025 : मॉन्सून कोकणात इलो, यंदा ११ दिवस आधीच आगमन; देवगडपर्यंत मजल
esakal May 26, 2025 08:45 AM

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरू असतानाच नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) दणक्यात आगमन झाले आहे. मॉन्सूनने रविवारी तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिली. विशेष म्हणजे १९९० नंतर प्रथमच मॉन्सून इतक्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

मॉन्सून १९९० मध्ये २० मे रोजी तळकोकणात दाखल झाला होता.केरळसह, कर्नाटक किनारपट्टीवर आठवडाभर आधीच दाखल झालेला मॉन्सून सर्वसाधारण वेळेपेक्षा (५ जून) यंदा ११ दिवस आधीच डेरेदाखल झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो महाराष्ट्रात पोहोचला आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्राने चाल दिल्याने मॉन्सून प्रवाहाचा वेग अधिक बळकट झाला आहे. मॉन्सूनने आज कर्नाटकच्या आणखी काही भागासह, संपूर्ण गोवा आणि तळकोकणात मजल मारली आहे. तर ईशान्य भारतातही मॉन्सूनने वाटचाल सुरूच ठेवली असून, मिझोराम, मणिपूर आणि नागालँड राज्यात प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदा अंदमान बेटांसह देशात मॉन्सूनचा वेगाने प्रवास सुरू आहे. मॉन्सूनने शनिवारी (ता. २४) केरळमध्ये धडक दिली होती. रविवारी (ता. २५) देवगड, बेळगावी, हवेरी, मंड्या, धर्मपूरी, चेन्नई तसेच ईशान्य भारतातील कोहिमा पर्यंत मॉन्सून पोचला आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग आणि ईशान्य भारताच्या आणखी काही भागांत तो दाखल होऊ शकतो.

सिंधुदुर्गात पुन्हा जोर

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात शनिवारी किंचित कमी झालेल्या पावसाचा जोर रविवारी मात्र वाढल्याचे दिसते. जिल्ह्याच्या सर्व भागात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात रोपवाटिकांची कामे रखडल्याने शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात २० मे पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन ते तीन दिवस बरसल्यानंतर शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सायंकाळी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या.

१९९० मध्ये सर्वांत लवकर आगमन

१९६० पासूनच्या नोंदीनुसार मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाच्या वेळा लक्षात घेता १९९० मध्ये मॉन्सून सर्वाधिक लवकर म्हणजेच २० मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यापूर्वी १९६२ मध्ये, तसेच यंदा मॉन्सून २५ मे रोजी महाराष्ट्रात धडकला आहे. १९७० मध्ये २९ मे रोजी तर १९७१ आणि २००६ मध्ये ३१ मे रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या भूमीवर पोचला होता

पेरणीची घाई नको

मुंबई : मॉन्सून यंदा राज्यात वेळेआधीच दाखल झाला असला तरीसुद्धा शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मॉन्सूनच्या प्रवासाची गती येत्या मंगळवारपासून (ता. २७) कमी होणार असल्यामुळे हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. राज्यातील हवामान २७ मे पासून कालांतराने कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहू शकते.

मॉन्सूनचे राज्यातील वेगवान आगमन

वर्ष तारीख

  • १९९० २० मे

  • १९६२ २५ मे

  • २०२५ २५ मे

  • १९७० २९ मे

  • १९७१ ३१ मे

  • २००६ ३१ मे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.