डहाणू-जव्हार राज्यमार्गाची रखडपट्टी
२५० कोटी रुपयांची तरतूद; धोकादायक पुलांचे बांधकाम करण्याची मागणी
कासा, ता. २७ (बातमीदार) ः डहाणू-नाशिक राज्य मार्गावरून विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी डहाणू-नाशिक राज्यमार्ग सध्या रखडलेल्या अवस्थेत आहेत. या रस्त्याच्या नूतनीकरणास पावसाळ्यानंतरच गती मिळणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी हा राज्यमार्ग महत्त्वाचा असल्याने त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले होते. सुमारे २५० कोटी रुपयांच्या खर्चाचा हा सिमेंट काँक्रीटीकरण व चौपदरीकरण प्रकल्प असून, डहाणू- पार नाका ते सरावली नाका दरम्यान चौपदरीकरण तर सरावली ते चारोटी या टप्प्यात दहा मीटर रुंदीचा सिमेंट महामार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर काही अडथळ्यांमुळे काम थांबविण्यात आले होते. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो झाडांची तोड प्रस्तावित असल्याने पर्यावरणीयदृष्टीने मुंबई उच्च न्यायालयात आक्षेप नोंदवण्यात आला. परिणामी, हे काम न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असून, डहाणू नगरपरिषद व पर्यावरण प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्यानंतरच पावसाळ्यानंतर कामास गती मिळणार असल्याची माहिती के. सी. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या मार्गावर डझनहून अधिक जुने, जीर्ण आणि अरुंद पूल व साकव असून, ते वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनले आहेत. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणी अपघातांची शक्यता अधिक असल्याने नागरिकांमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी तपासणी करून दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
....................
व्यवसायाच्या दृष्टीने उपयोगी मार्ग
हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. डहाणू येथे अनेक महाविद्यालये, शाळा, पर्यटनस्थळे असून, दररोज शेकडो विद्यार्थी आणि प्रवासी या मार्गाने मुंबई व नाशिककडे प्रवास करतात. याशिवाय, डहाणूतील अदानी थर्मल पॉवर प्रकल्प, आशागड येथील युनिव्हर्सल कॅप्सूल कंपनी आणि परिसरातील चिकू, मिरची, फुल व नारळाच्या बागांचे उत्पादक मुंबई बाजारपेठेत माल वाहतूक करत असतात. त्यामुळे या मार्गावर चोविस मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत असते. शेकडो अवजड वाहने दररोज या मार्गावरून धावत असून, रस्ता अरुंद व अपुर स्थितीत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने व सुरक्षितरित्या नुतनीकरण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून या परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासास चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.