मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक हालचाली वाढल्या आहेत. येत्या काळात भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यासह महत्त्वाच्या महानगरांत स्वबळावर निवडणुकांसाठी चाचपणी सुरु झाली आहे.
महायुतीत भाजपसोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबत काही पालिकांमध्ये युती व्हावी, असा प्रयत्न आहे. मात्र मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये युती करू नये अशा स्पष्ट सूचना शहा यांनी केल्याचे समजते. त्यामुळे प्रदेश भाजपने त्या दृष्टीने काम सुरु केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर प्रदेशातील नेत्यांच्या या तातडीच्या बैठकीने भाजपातील संघटनात्मक बदलांना गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
संघटन पर्वांतर्गत भाजपतील मंडल अध्यक्ष आणि ७२ पैकी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित नियुक्त्तांवर अद्याप सहमती झालेली नसल्याचे समजते.