चाकण - चाकण-आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील सोहम उल्हास कडुसकर, सूजय दिलीप कडूसकर (दोघेही वय १७, कोरेगाव, ता. खेड) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताने कोरेगाव खुर्द गावावर शोककळा पसरली. दरम्यान या अपघात प्रकरणी ट्रकचालक गणेश वसुदेव मायकर (वय-३० वर्ष, रा. साळिंबा, ता. वडवणी, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
बिरदवडी फाट्याजवळ (ता. खेड) येथे झाला. दोघे तरुण कोरेगाव खुर्द येथून सकाळी चाकण येथे एमएससीआयटीच्या क्लासला चालले होते. आंबेठाण बाजूकडून येणाऱ्या अवजड ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
त्या धडकेने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मार्गावर अस्ताव्यस्त पडले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कोरेगाव खुर्द व स्थानिक परिसरातील अनेक तरुण, नातेवइक यांनी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी केली होती.
नातेवाइकांच्या दुःखाच्या आक्रोशामुळे वातावरण सुन्न झाले होते. सोहम व सुजय हे दोघेही आईवडिलांना एकुलते एक होते. दोघांच्या पाठीमागे आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. दोघेही शेतकरी कुटुंबातील होते.
या अपघातानंतर कोरेगाव खुर्दचे माजी सरपंच कैलास गाळव यांनी सांगितले की, 'औद्योगिक वसाहतीमुळे रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. चाकण -आंबेठाण मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. चाकण -आंबेठाण मार्गाचे काम झाले तरी ते अपुरेच आहे रस्ता अरुंद आहे. पाणी साचलेले आहे. दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत, या अपघाताला कोण जबाबदार? या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
स्वप्नांचा चक्काचूर
सोहमला दहावीच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. सोहम व सुजय दोघे हुशार होते. सोहम व सुजय नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले होते. सोहमला व सुजयला पुढे शिकून काहीतरी बनायचे असे स्वप्न होते, परंतु काळाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.