Maharashtra Live Updates : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Sarkarnama May 31, 2025 03:45 PM
Vaishnavi Hagwane Case : निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आज त्याला कार्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचं बाळ निलेशने कोणत्या अधिकरावर घेतलं, तसंच त्याच्याकडून पिस्तूल आणि मोबाईल डेटा जप्त करायचा आहे, यासाठी त्याची कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे.

ShivendraRaje Bhonsle : मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे फेसबुक पेज हॅक

सातारचे आमदार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे मंत्री शिवेंद्रराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांकडून या हॅकरचा शोध सुरू आहे. दरम्यान, पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन भोसलेंच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणावर आज पहाटेपासून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागावर कारवाई सुरू असून अतिक्रमणे हटवण्यात येत आहे. 31 मे पूर्वी गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांनी दिलेली मुदत आज संपत होती. त्यामुळे अतिक्रमणाबाबत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेत कोल्हापूर पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. अतिक्रमण केल्यापैकी 64 जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामध्ये 14 अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुन्हा पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली होती. नंतर अतिक्रमणधारक सहकार्य करत असून अतिक्रमण काढण्यास मदत करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे

दाभडी गावात ३ जून रोजी काँग्रेसचे ‘क्या हुआ तेरा वादा’? आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यामंध्ये वाढ होत आहे, दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदींनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष ३ जून रोजी यवतमाळमधील दाभडी गावात ‘क्या हुआ तेरा वादा’? असा प्रश्न विचारत पदयात्रा काढणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा

राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा, अशी मागणी मनसेकडून मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. 4-5 दिवसांत मनसेचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे यांसारखे प्रकार सर्रास सुरू त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी राज्यपुरुष आयोगाची गरज असल्याचे पत्र मनसे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा करण्यात आली. रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनाला दोघेही एकाच वेळी दर्शनाला आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

निलेश चव्हाणला पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार

वैष्णवी हगवणे प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली. निलेश चव्हाणला आज (शनिवारी) पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. निलेशवर वैष्णवीच्या आई वडिलांना बंदूक दाखवत धमकावल्याचा तसेच वैष्णवीच्या नऊ महिन्याची बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे.

शासकीय कर्मचारी महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासकीय सेवेत असलेल्या तब्बल 2652 महिलांनी घेतल्याचे समोर आले आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी तब्बल 3 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ घेतला. हे पैसे सरकारकडून वसुल करण्यात येणार आहे. दरम्यान, फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या की काय होतं हेच यातून सिद्ध होतं. पण आतातरी सरकारने संबंधित योजनेतील गैरप्रकारांना आळा घालावा आणि निवडणुकीत ₹१५००चे ₹२१०० करण्याचं दिलेलं आपलं आश्वासन पूर्ण करावं, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.