पप्पा फक्त ओळख करून द्यायला गेले पण... श्रिया पिळगावकरने सांगितला जितेंद्र यांच्या भेटीचा 'तो' किस्सा, म्हणाली-
esakal June 01, 2025 12:45 AM

आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगावकर चाहत्यांची लाडकी आहे. अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी असूनही तिने कधीही त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला नाही. तिने स्वतःच्या मेहनतीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती 'ताजा खबर', 'गिल्टी माईंड', 'द ब्रोकन न्यूज', 'ड्राय दे', 'कादन' सारख्या सीरिज आणि चित्रपटात दिसलीये. ती लवकरच 'छळ कपट' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने जितेंद्र यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितलाय.

श्रियाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'आई वडील सुपरस्टार असण्याचे फायदे आहेत. मी सॅल्यूट करते त्यांना जे काहीही बॅकग्राउंड नसताना या इंडस्ट्रीत येतात आणि मेहनत करतात. मला करिअरच्या सुरुवातीला आई- वडिलांच्या कलाकार असण्याचा फायदा झाला. मी त्यांच्यासोबत 'एकुलती एक' हा चित्रपट केला. पण नंतर मी सगळी कामं ऑडिशन देऊन मिळवली. अगदी सगळी. बॉलिवूडमध्ये अनेक जण मी सचिन यांची मुलगी आहे म्हणून नाही ओळखत. कारण त्यांनी मला खूप लहान असताना पाहिलं होतं. जसं जॅकी दादा वगरे. असाच किस्सा जितेंद्र यांच्यासोबतही घडला.'

ती पुढे म्हणाली, 'सोनू निगम यांचा वाढदिवस होता. त्याची पार्टी होती. समोर जितेंद्र होते आणि पप्पा मला त्यांच्याशी ओळख करून द्यायला घेऊन गेले. पप्पा त्यांना सहज म्हणाले, ही माझी मुलगी, चांगलं काम करायला लागलीये हिंदीमध्येही. त्यांचा बाकी काही उद्देश नव्हता. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांवर गर्व असतो. तसाच त्यांनाही माझ्या कामाचा अभिमान आहे. त्यामुळे ते तसं बोलले. ते फक्त ओळख करून द्यायला गेले आणि जितेंद्र मला पाहून एकदम आश्चर्य चकीत झाले की मी सचिन यांची मुलगी आहे.'

श्रिया पुढे म्हणाली, 'कारण त्यांनी मला लहान असताना पाहिलेलं. आता थेट त्यांनी मला इतकं मोठं झालेलं पाहिलं तर ते लगेच म्हणाले, इतकी मोठी झाली. बापरे. त्यांना आश्चर्य वाटलं.' श्रिया 'मिर्झापूर'मध्येही दिसली आहे. सोबतच या मुलाखतीत तिने मराठी चित्रपटात काम करण्याचीदेखील इच्छा बोलून दाखवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.