पिंपरी : ‘‘पावसाचे दिवस संपल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. चार सदस्यांच्या प्रभागानेच ही रचना असेल. लोकसंख्या अधिक असल्याने मुंबईत मात्र एक प्रभाग रचना असेल. त्यामुळे आजपासूनच कामाला लागा,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नाना काटे, पंडित गवळी, अजित गव्हाणे, श्याम लांडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ३७ माजी नगरसेवकांसह या मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पवार म्हणाले, ‘‘बारामतीप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरानेदेखील मला प्रेम दिले. मध्यंतरी शहरातील अनेक सहकारी साथ सोडून गेले होते. राजकारणात चढ-उतार येतात. प्रत्येक वेळी हातात सत्ता पाहिजे असे नाही.
मीदेखील मनाची समजूत घातली. अनेकांच्या विनंतीवरून सगळ्यांना पक्ष प्रवेश द्यायचे ठरविले. सत्तेवर असणारे निवडणुका घेत नाहीत, असा चुकीचा प्रचार विरोधक करत आहेत. निवडणुका लागतील म्हणून अनेक इच्छुकांनी वारेमाप खर्च केला. आज पक्ष प्रवेश केलेल्यांमुळे पक्षाची ताकद वाढली आहे.’’ या वेळी बहल, लांडे, गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केली.
अंबानींच्या उदाहरणाबाबत चुकीचे व्हायरलगुजरात येथील विमान अपघातात एक व्यक्ती बचावला. तब्येत योग्य असली, की कसा उपयोग होतो हे त्यावरून कळते. नाही तर ‘‘अनेकांच्या ढेऱ्या फुटल्या’’ असा चुकून उल्लेख केल्यानंतर ‘‘सुटल्या’’ अशी दुरुस्ती पवार यांनी केली. चुकीचे लगेच व्हायरल होते. काही दिवसांपूर्वी एका भाषणात ‘‘पेट्रोल सोडून’’ असे म्हणालो, पण ‘‘चोरून’’ असे व्हायरल झाल्याचा खुलासा पवार यांनी या वेळी केला.