पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात लाँड्री सुविधा सुरू करण्यासाठी एक कोटी १५ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. या खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
माजी खासदार शेट्टी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर ही मागणी केली आहे. राज्य सरकारने कैद्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात लाँड्री सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी एक कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, ‘‘कारागृह विभागाने एक कोटी १५ लाख रुपये खर्च दाखविला आहे. परंतु या साहित्याची किमतीची चौकशी केली असता त्याच कंपनीचे साहित्य २६ लाख चार हजार २६० रुपयांना मिळत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या व्यतिरिक्त धुलाईचे इतर साहित्य कारागृहात निदर्शनास येत नाही. मग उर्वरित ८५ लाख ४६ हजार रुपयांचे कोणते साहित्य खरेदी केले याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,’’ असे शेट्टी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.