ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. मॅक्सवेल याची एकदिवसीय कारकीर्द 13 वर्षांची राहिली. मॅक्सवेलने या 13 वर्षांच्या वनडेत कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. मॅक्सवेल 2 वेळा वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग राहिला. ऑस्ट्रेलियाने 2015 आणि 2013 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला. मॅक्सवेल त्या संघाचा भाग होता. मॅक्सवेलने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक द्विशतक झळकावलं होतं. विजयी धावांचा पाठलाग करताना वनडेत द्विशतक करणारा मॅक्सवेल हा एकमेव फलंदाज आहे. मात्र आता त्याने वनडे क्रिकेटला अलविदा केलाय.मात्र टी 20I क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं या दिग्गज खेळाडूने स्पष्ट केलंय.
ग्लेन मॅक्सवेल याने 25 ऑगस्ट 2012 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. तर 4 मार्च 2025 रोजी मॅक्सवेलने टीम इंडिया विरुद्ध खेळलेला सामना हा त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरला. ग्लेनने एकूण 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 126.71 च्या स्ट्राईर रेटने आणि 33.81 अशा सरासरीने एकूण 3 हजार 990 धावा केल्या. मॅक्सवेलने या दरम्यान 382 चौकार आणि 155 षटकार लगावले. तसेच मॅक्सवेलने 23 अर्धशतकं, 4 शतकं आणि 1 ऐतिहासिक द्विशतकही झळकावलं.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत 7 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद द्विशतक झळकावलं होतं. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाची प्रत्युत्तरात 7 बाद 91 अशी स्थिती झाली होती. मात्र ग्लेन मॅक्सवेलने इथून सामना फिरवला आणि ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅक्सवेलने दुखापत असूनही जागेवर उभे राहून फटकेबाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅक्सवेलने 128 चेंडूत 10 षटकार आणि 21 चौकारांच्या मदतीने नाबाद 201 धावांची ऐतिहासिक खेळी केली.