Pune NCP City President : 'डबल' शहराध्यक्षपदाचा अनोखा 'डाव'; महापालिका निवडणुकीत बालेकिल्ला टिकविण्यासाठी अजित पवारांची रणनिती
esakal June 03, 2025 12:45 AM

पुणे - आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आणि राजकीय गणिते लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही शहर कार्यकारिणीच्या रचनेत मोठा बदल केला आहे. दोन शहराध्यक्ष आणि चार कार्याध्यक्षांची निवड करून वेगळा संदेश दिला आहे.

महायुतीमधील इतर पक्षांचे अनुकरण करतानाच पक्षातील अनुभव, संघटन कौशल्य, आक्रमकता आणि पक्ष विस्ताराला बळकटी देणाऱ्या चेहऱ्यांची निवड करत महापालिका निवडणुकीत आपला बालेकिल्ला राखण्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसत ‘डबल’ शहराध्यक्ष पदाचा अनोखा ‘डाव’ टाकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर मे महिन्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पक्षाला चांगलाच धक्का बसला होता. मानकर यांनी दिलेला शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात १० जूनला होत असताना, शहराध्यक्ष नसण्याची नामुष्कीची वेळ पक्षावर आली होती.

परंतु, त्यापूर्वीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडलेली शहराध्यक्षांची नावे आमदार चेतन तुपे यांनी जाहीर केली. त्यानुसार कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी या चार मतदारसंघांचा समावेश असणाऱ्या शहराच्या पूर्व भागासाठी सुनील टिंगरे यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

याच विभागाच्या कार्याध्यक्ष म्हणून रूपाली ठोंबरे व हाजी फिरोज शेख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची नियुक्ती केली.

या विभागाच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांना पुन्हा संधी दिली, तर अक्रूर कुदळे यांची दुसरे कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

पक्षाची प्रतिमा बदलण्यासह विस्ताराची धुरा

कल्याणीनगर अपघात प्रकरण, परदेशी महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक झालेला पक्षाचा अल्पसंख्याक विभागाचा पदाधिकारी शंतनू कुकडे, बनावट कागदपत्रे करून फसवणूक केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा, त्यानंतर राज्यभर गाजलेले वैष्णवी हगवणे प्रकरण, महिला आयोगावर झालेले गंभीर आरोप अशा विविध प्रकरणांमुळे पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

त्यामुळे पक्षाची प्रतिमा बदलण्यापासून ते पक्षाचा विस्तार वाढविण्याचे, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फुले, शाहू आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाण्याच्या आव्हानात्मक कामाची धुरा नवीन अध्यक्षांच्या खांद्यावर असणार आहे. त्यातून महापालिका निवडणुकीची नौका त्यांना यशस्वीपणे पार पाडावी लागणार आहे.

सुनील टिंगरे - राजकीय कारकीर्द

  • महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते.

  • माजी आमदार टिंगरे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढविली

  • कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेचे धनी

  • २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव

  • २००७ - नगरसेवक, २०१२ - पराभव, २०१७ - नगरसेवक

  • (वडगाव शेरी विधानभा मतदारसंघ ) (शिवसेना) - २०१४ - पराभूत

  • (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) - २०१९ - विजयी

  • (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) - २०२४ - पराभूत

सुभाष जगताप - राजकीय कारकीर्द

  • महापालिकेत नगरसेवक, सभागृह नेते म्हणून काम पाहिले

  • स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले

  • पक्षाकडून पर्वती विधानसभा निवडणूकदेखील लढविली आहे

  • महापालिकेतील कामाच्या अनुभवाचा महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगला उपयोग होणार

  • नगरसेवक - १९९२, २००२, २००७, २०१२

  • सभागृह नेते - २०११ ते २०१५

  • स्थायी समिती अध्यक्ष - २००२-३

  • पर्वती विधानभा निवडणूक उमेदवारी - (सर्वसाधारण गट) - २०१४

नवीन शहराध्यक्षांपुढे आव्हान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे शहरावरील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी महापालिका निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे हे नवीन शहराध्यक्षां पुढील आव्हान असणार आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही अध्यक्षांचा चांगला अभ्यास आहे. योग्य प्रभाग रचना करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा पक्षाला उपयोग होईल. महायुतीत घटक पक्षांबरोबरील संबंध टिकवितानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला कशा पद्धतीने सामोरे जायचे, हेदेखील त्यांच्यापुढील आव्हान असणार आहे.

कार्याध्यक्षांची निवड

कार्याध्यक्ष असलेल्या देशमुख यांनी तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते, मतदार जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. रूपाली ठोंबरे यांच्या माध्यमातून महिलेला कार्याध्यक्षपदी पहिल्यांदा पक्षाने संधी दिली. त्यांच्या आक्रमकतेचा पक्षाला उपयोग होऊ शकणार आहे. हाजी शेख आणि अक्रूर कुदळे यांचाही पक्ष विस्तार व निवडणुकीत पक्षाला उपयोग होईल, यादृष्टीने पक्षाने त्यांना संधी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.