ब्राझिलिया : हा सुंदरसा मजकूर मी सुंदरशा हॉटेलच्या सुंदरशा खोलीतील सुंदरशा मेजाशी बसून लिहीत आहे. यू ते अमो म्हणजे ब्राझिलियनमध्ये लव्ह यू!
आमचा परदेश दौरा संपत आला आहे. मला बघायला लांब लांबून लोक येतात. मी त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेतो. काढून देतोही!! मला सेल्फी काढायला खूप आवडते. माझ्याकडे शेकडो सेल्फी जमा झाल्या आहेत. सेल्फी काढून मी तातडीने आदरणीय पीएम मोदीजींना पाठवतो. त्यांनी मला तशी सूचनाच केली आहे. ब्राझिलची राजधानी म्हणजे ही ब्राझिलिया. आह! नावच किती सुंदर आहे! इथून समुद्र थोडा दूर आहे. पण मी ‘रिओ द जानिरो किंवा साव पावलोला जाऊन येऊ’ असा आग्रह शिष्टमंडळाच्या बाकीच्या सदस्यांकडे धरला आहे. बघू! यश आले तर समुद्रकिनारी जाऊन ‘हिंसाचाराला थारा देऊ नका’ असा संदेश देईन.
अमेरिका, कोलंबिया वगैरे देश फिरुन आमचे शिष्टमंडळ परवा ब्राझिलला पोचले. भारताची भूमिका मी सर्व ठिकाणी इतक्या प्रभावीपणाने मांडली की आदरणीय पीएम मोदीजींचे पक्षसहकारी असलेले खासदारसुद्धा फिके पडले. तसे पाहू गेल्यास माझ्यासमोर कोणीही फिके पडतेच! माझे व्यक्तिमत्त्वच इतके आकर्षक आहे की त्याला मी तरी काय करु?
ब्राझिलियामध्ये गेल्यावर इथल्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य सल्लागार सेल्सो अमोरिम यांना भेटून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ का केले, ते सांगितले. ते वारंवार मला विचारत होते की ‘‘सिंदूर म्हणजे काय?’’ मी बराच प्रयत्न केला. ‘सिंदूर हे फॅशन स्टेटमेंट नाही, तर पॅशन स्टेटमेंट आहे’ हे मी इंग्रजीतच त्यांना समजावून सांगितले. त्यांनी टाळ्या वाजवल्या. मग कानात म्हणाले की, ‘हे सगळं
इंग्लिशमध्ये सांगाल का?’ मी दमलो!!
अमेरिकेतल्या लोकांनाही मी इंग्रजी भाषेचा जबरदस्त न्यूनगंड देऊन आलो. हे गृहस्थ बोलतात, तीच इंग्रजी भाषा असून आपण शेकडो वर्ष बोलत आलो, ती खरे तर इंग्रजीच नाही, या निष्कर्षाप्रत ते येऊन ठेपले तेव्हा थांबलो!! त्यानंतर मी कोलंबियातही गेलो. बाय द वे, कोलंबिया हे नाव मिसलीडिंग आहे, असे मला वाटले. कारण कोलंबियात कोलंबी मिळत नाही!! असो. कोलंबी या विषयावर जास्त न बोलणेच इष्ट ठरावे. कोलंबियातील राज्यकर्त्यांनी भारताच्या ऑपरेशन ‘सिंदूर’वर टीका केली होती. पाकिस्तानातील मृतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली होती. पण ‘तुम्ही ज्यांना मृतात्मे म्हणताय, ते प्रत्यक्षात टेररिस्ट होते हे तुम्हाला माहीत आहे काय?’ असा स्टॅण्डिग क्वेश्चन (पक्षी : खडा सवाल) मी त्यांना केला. ते नाही म्हणाले. मग मी मोजून पावणेतीन तास इंग्रजी भाषेत त्यांचा दहशतवादावर क्लास घेतला. शेवटी त्यांनी श्रद्धांजलीचा ठराव मागे घेऊन भारताला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
‘हे केवळ तुमच्या इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे झाले. तुमचे इंग्रजी ब्राह्मोसपेक्षाही जबरी आहे,’ अशी कॉम्प्लिमेंट मला शिष्टमंडळातील एक सदस्य तेजस्वी सूर्या यांनी हिंदीत दिली!!
मी इथे आदरणीय पीएम मोदीजींनी सांगितल्यानुसार आल्यामुळे भारतात माझ्या पक्षाचे लोक रागावले आहेत, असे कळले. मी काँग्रेसची भाषा न बोलता कमळवाल्यांचीच भाषा बोलत आहे, असा त्यांचा आरोप आहे. पक्षीय राजकारणाची ही वेळ नाही, हे माझ्या पक्षातल्या लोकांना कधी कळणार? मायदेशी परत गेल्यावर माझे इंग्रजीचे ब्राह्मोस मी स्वपक्षीयांवर सोडणार आहे.
माझे इंग्रजी भाषेवर जसे प्रभुत्व आहे, तसेच हृदयाच्या भाषेवरही आहे, हे त्यांना आता कळेल!! च्याव-च्याव!!