Cycling Record ; साठीतील ध्येयवेड्या 'तरुणाची' असामान्य कामगिरी; सात वर्षांत एक लाख किलाेमीटर सायकलिंग पूर्ण, रचला नवा रेकॉर्ड
esakal June 04, 2025 02:45 AM

लातूर : ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी आपल्याकडे म्हण आहे. या म्हणीला प्रत्यक्षात खरे करून दाखवले ते लातूरमधील सायकलीस्ट संजय चंद्रकांत महाजन यांनी. वयाच्या साठीत तब्बल एक लाख किलोमीटर सायकलिंग पूर्ण करून त्यांनी नवा रेकॉर्ड रचला आहे. हा रेकॉर्ड करून त्यांनी नव्या सायकलपटूंना आणि तरुणांना आरोग्याप्रति जागरुकतेचा संदेश दिला आहे.

लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून महाजन हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. वय हे एक नाममात्र असते पण इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे महाजन यांनी सायकलींगबद्दल असलेली आवड आणि छंद जोपासला आहे.

१ जानेवारी २०१८ पासून त्यांनी सायकलिंगला सुरवात केली. दररोज ५० किलोमीटर ते सायकल चालवतात. असे महिन्याला दीड हजार किलोमीटर आणि वेगवेगळ्या मोहिमांमधून त्यांनी १ लाख किलोमीटरचा टप्पा गाठला आहे. स्ट्रावा या फिटनेस ॲपवर याची नोंद झाली आहे. या ॲपवर सायकल चालविताना प्रत्येक किलोमीटरची नोंद होते.

तिरुपती, रायगड, वैष्णोदेवीत सायकलिंग

युथ हॉस्टेल इंडिया आयोजित मनाली-लेह-खारदुंगला असा एकुण ५५० किलो मीटरचा घाट माथ्यावरील चढ-उतार असलेला अत्यंत खडतर असा प्रवास महाजन यांनी जिद्दीने पूर्ण केला. हा प्रवास त्यांना पाच वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण करायचा होता. पहिला टप्पा हा समुद्र सपाटीपासून तब्बल १३०५८ फूट उंचीवर होता.

जो मनाली पासून सुरू झाला होता. हा टप्पा पार करून परत घाट उतारावरून सायकलचे बॅलन्स करणे आणि परत दुसऱ्या टप्प्याकडे चढाई करत जाणे असे तीन-चार टप्पे करत पाचवा टप्पा हा लेह ते खारदुंगला हा ४० किलो मीटरचा अतिशय खडतर प्रवास सायकलवर पूर्ण करण्यासाठी महाजन यांना तब्बल १० तास लागले. या पूर्वी त्यांनी लातूर ते तिरुपती, लातूर ते रायगड, लातूर ते घुमान व वैष्णोदेवी आदी ठिकाणी सायकलिंग यशस्वी पूर्ण केली. ध्येय, आवड आणि आरोग्याप्रति जागरूकता असेल तर हे शक्य होते, असे महाजन यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.