अहिल्यानगरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष गैरहजर; भाजपमधील वाद चव्हाट्यावर
Marathi June 04, 2025 07:26 PM

भाजपने अहिल्यानगर शहरात नव्याने अध्यक्षाची निवड जाहीर केल्यानंतर आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला अध्यक्षच उपस्थित नसल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम केला. त्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे.

भाजपने नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविली. शिर्डी व अहिल्यानगर येथे जिल्हाध्यक्षाची निवड झाल्यानंतर नगर शहर-जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल मोहिते यांचे नाव निश्चितत केले. मोहिते हे विखे गटाचे मानले जात आहेत. अनेकांना ही निवड मान्य नसल्याने नाराजी दिसून आली. दोन दिवसांपासून अहिल्यानगर शहरामध्ये ‘हू इज धिस मोहिते?’ अशा पद्धतीने व्हिडीओ हा व्हायरल केलेला होता. त्यामुळे अखेरीस मोहिते यांनी आपल्याकडे कोणकोणत्या मोठ्या जबाबदाऱ्या होत्या, हे सोशल मीडियावरून सांगितले. आज झालेल्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी भाजपच्या मुख्य कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक होते; परंतु ते उपस्थित न राहिल्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा केला. दरम्यान, मोहिते हे कार्यक्रमानिमित्त लोणीला गेले असल्याचे सांगितले.

प्रा. राम शिंदे यांचे नाव हटविले
नूतन जिल्हाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू आहेत. विशेष म्हणजे, मोहिते यांच्या अभिनंदन फलकावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा फोटो आहे; परंतु विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे याच जिल्ह्यातले असूनही त्यांचा फोटो या अभिनंदन फलकावर नव्हता. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट असल्याचे दिसून आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.