बीड - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पंजाबमधील विधानसभेच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, या यादीत बीडचे रवींद्र दळवी यांचाही समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या प्रचारक यादीत सचिन पायलट, भूपेश बघेल, पवन खेरा, इमरान प्रतापगढी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसह दळवी यांचा समावेश आहे हे विशेष.
या यादीस काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी निवडणूक आयोगाला अधिकृत पत्र सादर केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही बाब गौरवाची असून, रवींद्र दळवी हे राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सक्रिय सदस्य आहेत.
रवींद्र दळवी हे काँग्रेस पक्षात दीर्घकाळपासून कार्यरत असून, जिल्हा पातळीपासून ते राज्य व आता राष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. समाजकारण, संघटन व निवडणूक प्रचाराचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
पंजाबमधील लुधियाना वेस्ट मतदारसंघातील पोटनिवडणूक ता. 19 जून 2025 रोजी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रचारासाठी हे स्टार प्रचारक मैदानात उतरतील. रवींद्र दळवी यांना मिळालेली ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवर पक्षश्रेष्ठींचा दाखवलेला विश्वास मानला जात आहे.