Ratnagiri Jets vs Eagle Nashik Titans : आजपासून सुरू झालेल्या अदाणी (MPL 2025) २०२५ स्पर्धेत गतविजेत्या रत्नागिरी जेट्सने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथे झालेल्या या लढतीत गत उपविजेता इगल नाशिक टायटन्स संघासमोर रत्नागिरीने तगडे लक्ष्य उभे केले. धीरज फटांगरेचे ( Dhiraj Phatangare) अर्धशतक व कर्णधार आझीम काझीच्या दमदार खेळीने रत्नागिरीला सावरले.
नाशिकचा कर्णधार प्रशांत सोळंकीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुकेश चौधरीच्या पहिल्याच षटकात प्रीतम पाटीलने दोन खणखणीत षटकार खेचून रत्नागिरीला चांगली सुरुवात करून दिली. पण, पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात प्रीतम ( १२) झेलबाद झाला. कर्णधार आझीम काझी आणि धीरज फटांगरे यांनी दमदार खेळ करताना दुसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे रत्नागिरी सहा षटकांत १ बाद ६४ धावांपर्यंत पोहोचला होता.
नाशिकच्या गोलंदाजांना सर्व प्रयत्न करूनही ही जोडी तोडता येत नव्हती. दोन वेळा रन आऊटची संधी मिळाली होती, परंतु क्षेत्ररक्षकांना अपयश आले. पण, नवव्या षटकात विकेट मिळाली. काझी ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर झेलबाद झाला. प्रशांत सोळंकीला ही विकेट मिळाली. काझी व धीरज यांची ४९ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी तुटली. पण, रत्नागिरीने १० षटकांत फलकावर शतकी टप्पा चढवला होता. निखिल नाईक ( १४) आणि धीरज यांची ३१ धावांची भागीदारी अक्षय वायरकने तोडली.
धीरजने ३७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. दिव्यांग हिंगणेकर ( २०) धावांवर झेलबाद झाला. १८व्या षटकात रत्नागिरीला चौथा धक्का बसला. धीरजने चांगली फटकेबाजी करताना MPL मध्ये वैयक्तिक ५०० धावांचा टप्पा ओलांडला. मनोज इंगळेने टाकलेल्या १८व्या षटकात १९ धावा चोपल्या गेल्या, जे या सामन्यातील सर्वात महागडे षटक ठरले. पण, पुढच्या षटकात मुकेश चौधरीने रत्नागिरीच्या किरण चोरमाळे ( ७) व साहिल चुरी ( ०) यांना माघारी पाठवले.
धीरज व अभिषेक पवार यांनी शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली आणि रत्नागिरीला ६ बाद १९४ धावांपर्यंत पोहोचवले. अभिषेकने ४ चेंडूंत नाबाद १० धावा केल्या, तर धीरज ४७ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिली. धीरने २०व्या षटकात २० धावा चोपल्या.