सांगली : अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भल्या पहाटे भररस्त्यावर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातल्या शंभरफुटी रोडवर पाठलाग करत धारदार शस्त्राने महेश कांबळे या तरुणाचा खून करण्यात आला आहे. सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर पहाटेच्या सुमारास भाज्यांचा लिलाव पार पडतो. याठिकाणी बाजारात किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी येत असतात. त्या निमित्ताने महेश कांबळे हा देखील येथे आला होता.
पाठलाग करत केली हत्या
दरम्यान भाजी लिलाव प्रक्रियेत महेश भाजीपाला घेण्यासाठी आला असताना दोघा अज्ञातांनी महेशवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी महेश गर्दीतून धावत सुटला असताना दोघांनी त्याचा पाठलाग करत कोयता व दगडांनी वार करत महेश कांबळे याच्यावर हल्ला करत हा खून केला आहे. महेश कांबळे हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता.
खुनाचे कारण अस्पष्ट
दरम्यान घटनेतील मृत महेश हा एका खुनातील आरोपी देखील होता. मात्र त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दरम्यान घटना घडल्यानंतर नी याबाबत माहिती देण्यात आलाय. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहे.