नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ‘राफेल’ या लढाऊ विमानाच्या काही सुट्या भागांची निर्मिती टाटा उद्योगसमूह करणार असून भारतासह अन्य देशांमध्ये त्यांची विक्री करण्यात येईल. यासाठी टाटा समूहाने ‘डसॉल्ट एव्हिएशन’ या फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हैदराबादेतील प्रकल्पामध्ये या सुट्या भागांची निर्मिती करण्यात येईल.
‘डसॉल्ट एव्हिएशन’ आणि ‘टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड’ (टीएएसएल) यांच्यात चार निर्मिती हस्तांतर करार झाले आहेत. भारतात प्रामुख्याने विमानाचे सांगाडे तयार केले जातील. हवाई उत्पादन क्षेत्रातील भारताची क्षमता वाढविण्याबरोबरच वैश्विक पुरवठा साखळी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशानेच ही भागीदारी करण्यात आली आहे. हैदराबादेतील या प्रकल्पामुळे भारतामध्ये लक्षणीय गुंतवणूक होणार असून उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून देश नावारूपास येईल असे दोन्ही समूहांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पातील सांगाड्यांची निर्मिती करणारा आणि अंतर्गत सुट्या भागांची जुळवाजुळव करणारा विभाग २०२८ पर्यंत कार्यान्वित होईल.
या प्रकल्पातून दरमहा दोन सांगाड्यांची निर्मिती होईल. दरम्यान राफेल विमानांची देशाबाहेर उत्पादन करण्याची फ्रान्स सरकारची ही पहिली वेळ आहे. ‘डसॉल्ट एव्हिएशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि अध्यक्ष एरिक ट्रॅपियर म्हणाले की देशाबाहेर राफेलच्या महत्त्वपूर्ण भागांचे उत्पादन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतामधील पुरवठा साखळी भक्कम करण्याच्या अनुषंगाने हे पाऊल निर्णायक ठरेल. भारतीय एअरोस्पेस उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या ‘टीएएसएल’सारख्या समूहाने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. आम्ही आमच्या उत्पादनांची गुणवत्ता कायम ठेवू.
भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील हे मोठे पाऊल आहे. यानिमित्ताने ‘टीएएस’वरील विश्वासच दिसून येतो. ‘डसॉल्ट एव्हिएशन’सोबतची भागीदारी यानिमित्ताने अधिक भक्कम होईल यात शंकाच नाही. हवाई उत्पादन क्षेत्रात भारताने स्वतःची भक्कम अशी इकोसिस्टिम तयार केली असून त्याचा अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना लाभच होईल.
- सुकरण सिंह, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक (टीएएसएल)
वैशिष्ट्यपूर्ण एअरोडायनॅमिक आकारराफेल विमानाची लांबी ही १५.२७ मीटर इतकी आहे तर यातील मुख्य सांगाड्याचे वजन सुमारे २ ते ३ हजार किलोग्रॅम इतके असते. विमानाच्या एकूण वजनाच्या तुलनेत हे प्रमाण २० ते ३० टक्के इतके आहे. विमानाने वेगाने उड्डाण करावे तसेच त्याचे हवेसोबतचे घर्षण कमी व्हावे यासाठी त्यांना एअरोडायनॅमिक आकार दिला जातो. राफेल विमानाच्या पुढे छोटे कॅनॉर्ड विंग्ज आणि मागे त्रिकोणी डेल्टा आकाराचे पंख जोडले जातात. उड्डाणात स्थिरता देण्यासाठी हे पंख महत्त्वाची भूमिका बजावतात. सांगाड्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे विमानाला अल्पावधीत प्रचंड गती घेता येते. एकदा उड्डाण केल्यानंतर राफेल विमान ३७०० किलोमीटरचे अंतर पार करू शकते.