Pune News: पुण्यात पोलिसाची आत्महत्या ; बायको -मुलगी गावी गेले असताना आयुष्य संपवलं
Saam TV June 07, 2025 09:45 AM
अक्षय बडवे, पुणे

पुण्यात पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलिस दलात कार्यर्त असलेल्या पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. बायको आणि मुलगी गावी गेले असता या पोलिसांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या पोलिसाच्या आत्महत्येचा कारण अस्पष्ट आहे. सध्या पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पोलिसाच्या आत्महत्येचे कारण सध्या अस्पष्ट आहे. सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय ४६ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या पोलिसाच्या घरात सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन सुर्वे हे खडक पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते बायको आणि मुलीसह शिवाजीनगर पोलिस वसाहतीत नवीन बिल्डिंग येथे राहत होते. त्यांची बायको आणि मुलगी गावी गेल्यामुळे ते सध्या एकटे घरी होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी सचिन सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. सचिन सुर्वे यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.