पीएसजीच्या ऐतिहासिक जेतेपदाचे शिल्पकार
esakal June 08, 2025 12:45 PM

जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com

पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) या फ्रान्समधील फुटबॉल क्लबने मागील शनिवारी इटली येथील इंटर मिलान या तीन वेळच्या विजेत्या संघाचा ५-० असा धुव्वा उडवला आणि पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाला गवaसणी घातली. पीएसजी क्लबला यंदाच्या मोसमात दिग्गज खेळाडूंचा परिस स्पर्श लाभला नव्हता. हा संघ चॅम्पियन होईल, यावरही प्रश्नचिन्ह होते. एका व्यक्तीने पीएसजी संघाचा कायापालट केला. शून्यामधून विश्व निर्माण केले. मुख्य प्रशिक्षक लुईस एनरिक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसजी संघाने इतिहास रचला.

पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) या फ्रान्समधील फुटबॉल क्लबची स्थापना १९७०मध्ये झाली. व्यावसायिकांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये फुटबॉल क्लब असावा, या हेतूने क्लबची स्थापना केली. तिथपासून आजपर्यंत या क्लबचा प्रवास सुरू आहे. २०११मध्ये कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट यांनी पीएसजी संघाचा बहुतांशी मालकी हक्क आपल्याकडे घेतला. आर्कटॉस यांचीही या क्लबमध्ये भागीदारी आहे.

पीएसजी या क्लबने फ्रान्समधील स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली; मात्र चॅम्पियन्स लीग या युरोपियन स्तरावरील वरच्या क्रमांकावर असलेल्या स्पर्धेचे जेतेपद त्यांना काही पटकावता येत नव्हते. फ्रान्समधील प्रत्येक क्लबची तीच अवस्था आहे हे काही वेगळे सांगायला नको. मार्सेल क्लबने मिलानवर विजय मिळवून चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले होते. ही घटना १९९३मधील. २०२५मध्ये या घटनेला ३२ वर्षे झाली.

फ्रान्समधील फुटबॉल क्लब्सचा इतिहास पाहता पीएसजीचे यंदाच्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद नक्कीच देदीप्यमान ठरले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पीएसजी क्लबने स्टार अन् महान खेळाडूंना करारबद्ध करीत चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्न केले होते. लियोनेल मेस्सी, नेमार, किलियन एम्बाप्पे या दिग्गज खेळाडूंना संघाशी जोडण्यात आले होते. पीएसजीने २०२०मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली होती; पण जर्मनीतील बायर्न म्युनिच क्लबने त्यांच्यावर मात करीत सहाव्यांदा विजेता होण्याचा मान संपादन केला होता. या पराभवामुळे पीएसजीच्या स्वप्नांना सुरुंग लागला.

लुईस एनरिक यांच्याशी पीएसजी क्लबने २०२३मध्ये करार केला. एनरिक यांच्याकडे प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. बार्सिलोना, रोमा, सेल्टा या विविध क्लब्ससह त्यांनी स्पेन या राष्ट्रीय संघालाही मार्गदर्शन केले आहे. बार्सिलोना क्लबला २०१५मध्ये तिहेरी यश संपादन करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बार्सिलोना क्लबने २०१५मध्ये ला लिगा, कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग या तीन स्पर्धांच्या जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. एनरिक यांचा परिस स्पर्श यंदा पीएसजीला लाभला आणि या संघाने बार्सिलोना संघासारखी नेत्रदीपक कामगिरी फुटबॉलच्या रणांगणात करून दाखवली. पीएसजी संघाने या मोसमात चॅम्पियन्स लीगसह लीग १ व कोप दे फ्रान्स या दोन स्पर्धाही आपल्या नावावर केल्या हे विशेष.

पेप गार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखाली २००८-०९मध्ये बार्सिलोना क्लबने आणि मँचेस्टर सिटी क्लबने २०२२-२३मध्ये तिहेरी मुकुटावर हक्क सांगितला होता. दोन वेगवेगळ्या क्लबसह तिहेरी यश मिळवणारे एनरिक हे गार्डियोला यांच्यानंतरचे दुसरेच प्रशिक्षक होय. एनरिक यांच्या संस्मरणीय यशाचा प्रवास तसा सोपा नव्हता. त्यांना खडतर मार्गामधून जावे लागले; मात्र हार न मानता त्यांनी पीएसजी क्लबला भव्यदिव्य यश मिळवून दिले.

एनरिक यांनी पीएसजी क्लबमधील सुपरस्टार खेळाडूंची संस्कृती मोडून काढली. आक्रमक फळीतील खेळाडू नेमार व मधल्या फळीतील खेळाडू मार्को वेराटी यांच्यासोबतचा करार मोडीत काढण्यात आला. याचदरम्यान किलियन एम्बाप्पे हा फ्रान्स संघातील अनुभवी खेळाडू रेयाल माद्रिद क्लबशी जोडला गेला. यानंतर पीएसजी संघाचा पाय खोलात गेला, असे वाटू लागले. चॅम्पियन्स लीगचे जेतेपद दूरच राहिले, फ्रेंच लीग स्पर्धाही त्यांना जिंकता येईल का, यावर मोठा यक्षप्रश्न उभा राहिला.

एनरिक यांना मैदानात सर्वस्व देणारे खेळाडू संघात हवे असतात. समर्पण, निष्ठा ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. उस्माने डेम्बेले हा खरेतर अव्वल दर्जाचा खेळाडू; पण त्याच्यामध्ये कमतरता दिसली अन् एनरिक यांनी आर्सेनलविरुद्धच्या लढतीसाठी पीएसजी क्लबमधून त्याला वगळले. या लढतीत पीएसजी क्लबचा ०-२ असा पराभव झाला. या पराभवानंतर एनरिक यांच्यावर टीका करण्यात आली; पण एनरिक यांनी आपले तत्त्व सोडले नाही. आपली भूमिका बदलली नाही. डेम्बेले यानेही या प्रकरणानंतर इतर संघात जाणे पसंत केले नाही. तो शांत राहिला. एवढेच नव्हे तर त्याने यानंतर मैदानात प्रयत्नांची शिकस्त केली. पीएसजीच्या घवघवीत यशामध्ये मोलाची भूमिका बजावली.

पीएसजी क्लबसाठी या मोसमात आणखी एक घटना कलाटणी देणारी ठरली. चॅम्पियन्स लीगमध्ये पीएसजी-मँचेस्टर सिटी यांच्यामध्ये महत्त्वाची लढत रंगली. या लढतीतील पराभवाने पीएसजी संघाचे आव्हान संपुष्टात येणार होते. मँचेस्टर सिटीचा क्लब या लढतीत २-० असा आघाडीवरही होता. त्यानंतर ५६व्या मिनिटांपासून ९३व्या मिनिटांपर्यंत पीएसजी संघाने चार गोल करीत रोमहर्षक विजय मिळवला. ही किमया एनरिक यांच्या जादूई मार्गदर्शनाची.

एनरिक यांनी पीएसजी संघ घडवला, असे याप्रसंगी आवर्जून म्हणता येईल. युवा खेळाडूंमधील गुण हेरून त्यांना संधी दिली. त्यांना चॅम्पियन खेळाडू बनवले. खविचा क्वारतखेलिया, उस्माने डेम्बेले, डेसिरे डुए या आक्रमक फळीतील खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी केली. अश्रफ हकिमी, विटिन्हा, मार्किन्होस यांनी मधल्या व बचाव फळीत जीवाचे रान केले. पीएसजी क्लबने इंटर मिलानवर मिळवलेल्या पंचतारांकित विजयात चार वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले होते. यावरून एनरिक यांनी सांघिक खेळाला किती महत्त्व दिले हे प्रकर्षाने जाणवते. डेसिरे डुए व सेनी मायुलू हे सर्वात युवा खेळाडू. दोघांनीही अंतिम फेरीत गोल करीत पीएसजीला जेतेपद मिळवून देण्यात हातभार लावला. डुए याच्याकडे तर भविष्यातील सुपरस्टार खेळाडू म्हणून बघितले जात आहे.

इंटर मिलान क्लब जेतेपदाच्या लढतीत बचावात्मक खेळावर लक्ष देणार हे एनरिक यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे अगदी पहिल्या मिनिटापासून आक्रमण करण्याची रणनीती आखण्यात आली. या लढतीत इंटर मिलानच्या खेळाडूंच्या पायामध्ये फुटबॉल येतच नव्हता. गोल करण्याचा प्रयत्न तर दूरच राहिला. पीएसजीच्या आक्रमणात कमालीची धार होती. चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना म्युनिचमध्ये पार पडला, असे वाटलेच नाही. एखादी साधी लढत झाली असा भास झाला; पण पीएसजीच्या सेव्हन स्टार खेळाचे महत्त्व यामुळे कमी होत नाही.

एनरिक यांनी पीएसजी क्लबला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भविष्यात आता या क्लबकडून मोठ्या आशा बाळगल्या जातील. जेतेपदाचा जल्लोष होत असतानाच एनरिक यांना वयाच्या नवव्या वर्षी निधन झालेल्या आपल्या कन्येची आठवण झाली. डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले अन् भावना दाटून आल्या. माझी लेक माझ्या हृदयात कायमस्वरूपी असेल, असे भावुक उद्गार एनरिक यांनी शेवटी काढले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.