Major Sunil Shinde : मेजर सुनील शिंदे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
esakal June 09, 2025 05:45 AM

मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सुपुत्र मेजर सुनील सोनबापू शिंदे यांना आज सायंकाळी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. भारतीय लष्कराच्या वतीने त्यांना ध्वजाच्छादन व तीन तोफांची मानाची सलामी देण्यात आली. गावात शासकीय इतमामात झालेला हा पहिलाच अंत्यसंस्कार असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

पार्थिवावर भारतीय तिरंगा ध्वज आच्छादित करण्यात आला होता. सुशोभित रथातून निघालेल्या अंत्ययात्रेत गावातील वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने गजर करत पुढाकार घेतला होता. वैकुंठ भूमीवर आच्छादित केलेला ध्वज पत्नी सारिका यांच्याकडे लष्करातील अधिकाऱ्यांनीप्रदान केला.. त्यानंतर जवानांनी बंदुकींच्या सलामीने शिंदे यांना अंतिम मानवंदना दिली. कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला होता.

अंत्यविधीसाठी लष्कराच्या वतीने मेजर परमहेंद्रसिंह आणि मेजर सुमन सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण करून शोक व्यक्त केला. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वैभव वायाळ, उपसरपंच प्रवीण भोर, धोंडीभाऊ महाराज शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर , बाळासाहेब बाणखेलेआदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी गावातील नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, लष्करी अधिकारी, मित्रपरिवार आणि शिंदे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.