Pune Traffic Police : नेमून दिलेले चौक सोडून 'कारवाई'; वाहतूक शाखेतील तीन पोलिस निलंबित
esakal June 09, 2025 05:45 AM

पुणे : वरिष्ठांकडून नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच ठिकाणी वाहनचालकांवर घोळक्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. घटनास्थळी पाहणी आणि अहवालानंतर प्रभारी पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ही कारवाई केली.

खडक वाहतूक विभागातील पोलिस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार, मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शहर वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रणासाठी विशिष्ट चौकात नेमले जाते. वाहतूक नियमन करणे, वाहतूक कोंडी होऊ न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

मात्र, १५ मे रोजी हवालदार यादव (स. प. महाविद्यालय चौक), पवार (हिराबाग चौक) आणि करंजकर (भावे चौक) हे त्यांना नेमून दिलेल्या चौकात वाहतूक नियमन न करता पूरम चौकात वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत होते

एकाच ठिकाणी घोळक्याने थांबून वाहनचालकांची अडवणूक करून दंड आकारत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशीनंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.