Raja Raghuvanshi : MP ते UP व्हाया मेघालय! १९ दिवसांची शोध मोहिम एका कॉलने थांबली, सोनमने का केली राजाची हत्या?
esakal June 09, 2025 06:45 PM

हनीमूनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. १७ दिवसांनी सोनम रघुवंशी सापडली असून तिला राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलीय. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी तिने मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. राजा रघुवंशीचा मृतदेह २ जून रोजी सापडला. त्यानंतर आठवड्याभराने मध्यरात्री एक वाजता सोनमने पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण केलं. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये तिला एका ढाब्यावरून अटक करण्यात आलीय.

सोनमने पती राजा रघुवंशीची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोनमने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील ३ मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. सोनमला अटक केल्यानंतर तीन मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली आहे. तर एकाचा शोध घेतला जात आहे. सोनमने घरी कॉल केल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती.

सोनम आणि राजा रघुवंशी यांचं लग्न ११ मे रोजी इंदौरमध्ये झालं होतं. यानंतर दोघे २० मे रोजी हनीमूनसाठी मेघालयात गेले. मेघालयात शिलाँगमध्ये पोहोचल्यानंतर दोन दिवसांनी दोघांचाही संपर्क बंद झाला. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम राबवण्यात आली. शहरातील सीसीटीव्ही फूटेज, दुकानांमधील सीसीटीव्ही फूटेजद्वारे तपास सुरू केला.

मेघालयात ज्या भागात दोघेही थांबले होते आणि जिथं स्कुटी सापडली होती तिथं शोध मोहिम राबवण्यात आली. बेपत्ता झाल्यानंतर ११ दिवसांनी २ जून रोजी पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृतदेहाशेजारी काही वस्तू सापडल्या. मात्र अंगावरचे सोन्याचे दागिने गायब होते.

राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमच्या कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. सोनम कुठे असेल, तिच्यासोबत काय घडलं असेल याची चिंता कुटुंबियांना लागली होती. दरम्यान, मेघालय आणि मध्य प्रदेशात शोधमोहिम सुरू असताना सोमवारी पहाटे पोलिसांना सोमन सापडली. सोनम ज्या ढाब्यावर थांबली होती तिथून पोलिसांना कॉल करण्यात आला.

उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये ११२ नंबरवरून अचानक नंदगंजच्या एका ढाब्यावरून फोन आला. तिथं सोनम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पटाहे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास नंदगंजमधील ढाब्यावर पोहोचले. तिथूनच सोनमनने भावालासुद्धा कॉल केला होता. सोनमने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर तिच्यासह इतर ३ साथीदारांना अटक करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.