पनवेल, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय प्रसिद्ध केला असून, यामुळे पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो बालकांना थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयानुसार ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी ‘आधारशिला बालवाटिका १’, ‘बालवाटिका २’ आणि ‘बालवाटिका ३’ असे टप्पेवार अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. यामधून खेळत-खेळत शिक्षण, गाणी, गोष्टी, चित्रे, हस्तकला, हालचाली यांचा वापर, मुलांच्या नैसर्गिक उत्सुकतेला चालना देणारे वातावरण, एकसंध व अनुभवाधारित शिक्षण मिळणार आहे.
बालवाटिकेचा अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने तयार केला असून, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या पायाभूत अभ्यासक्रमानुसार राज्यात राबवला जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात पूर्वप्राथमिक शिक्षण हा शालेय शिक्षणाचा पाया मानला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण अधिक दर्जेदार व एकसंध बनवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होणार आहे. यासोबतच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरमार्फत सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. तसेच रिकाम्या जिल्हा परिषद शाळांतील वर्गखोल्यांमध्ये अंगणवाड्यांचे स्थानांतर करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाड्यांचे शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होईल आणि लहान मुलांच्या समग्र विकासाला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
बालवाटिका म्हणजे काय?
बालवाटिका म्हणजे ३ ते ६ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठीचा एक पूर्वप्राथमिक अभ्यासक्रम आहे, जो खेळ, गाणी, गोष्टी आणि कृतींच्या माध्यमातून मुलांचा संपूर्ण मानसिक, शारीरिक, भाषिक आणि सामाजिक विकास करण्यावर भर देतो. बालवाटिका म्हणजे लहान मुलांसाठीचा बागेसारखा आनंददायी शिक्षणाचा परिसर.
-------------
बालवाटिकेची उद्दिष्टे
लहान मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे, सर्जनशीलता, संवादकौशल्य, सहकार्य, आत्मविश्वास यासारख्या कौशल्यांचा विकास, शाळेत प्रवेशापूर्वी मूल शिकण्याच्या सवयी लावणे.
-----------------
बालवाटिकेतील शिक्षण
खेळत खेळत शिक्षण, गाणी, गोष्टी, चित्रे, हस्तकला, हालचाली यांचा वापर, मुलांच्या नैसर्गिक उत्सुकतेला चालना देणारे वातावरण, एकसंध व अनुभवाधारित शिक्षण
-----------------
वयोगटानुसार बालवाटिका
बालवाटिका १ – ३ वर्षांचे मूल
बालवाटिका २ – ४ वर्षांचे मूल
बालवाटिका ३ – ५ ते ६ वर्षांचे मूल (शाळेत जाण्याच्या अगोदरचा शेवटचा टप्पा)