MNS-Thackeray Group alliance banners in Pune, Mulund; Workers appeal to leaders
Marathi June 10, 2025 12:26 AM


राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊही लागले आहेत.

मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊही लागले आहेत. पण उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्याकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही संदेश नाही तर बातमी देऊ, असे विधान उद्धव ठाकरे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना ही बातमी नेमकी कधी मिळणार? याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. अशातच आता पुणे आणि मुंबई उपनगरातील मुलुंड या ठिकाणावरील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना एकत्र येण्यासाठी साद घातली आहे. (Maharashtra Politics: MNS-Thackeray Group alliance banners in Pune, Mulund; Workers appeal to leaders)

आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात आली आहे. 9 जूनपासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिकेच्या तयारीची सुरुवात करणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने मुलुंड येथील कालिदास सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात युवासेना नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. पण या कार्यक्रमाच्या आधी कार्यक्रमस्थळाच्या बाहेर मनसेचे महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक यांनी दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याची साद घातली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाआधी हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. “वाट बघतोय महाराष्ट्र, साद घालतोय महाराष्ट्र..! हीच ती वेळ, महाराष्ट्र हितासाठी..!” असे आशय असलेले मुलुंडमध्ये लावण्यात आलेले बॅनर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

हेही वाचा… Sonam Raghuvanshi : सोनम सापडताच राजा रघुवंशीची आई म्हणाली, ती खरंच दोषी असले तर…

तर, पुण्यात मात्र ठाकरे काका – पुतण्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एकाच बॅनरवरून देण्यात आल्या आहेत. आज सोमवारी (ता. 9 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. असे असताना पुण्यातील शिवसैनिकांकडून चौका-चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. राज ठाकरे यांचा वाढदिवस हा 14 जून ला असतो, तर त्याच्या एक दिवस आधी ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे ठाकरे काका – पुतण्याला काही पदाधिकाऱ्यांनी एकाच बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र असल्याचे पाहायला मिळत असताना दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार? याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.