Pune News : धानोरी–लोहगाव भागातील नागरिकांचे मूलभूत सुविधांअभावी PMC समोर आंदोलन
esakal June 12, 2025 09:45 AM

पुणे : हजारो रुपयांचा कर वसूल करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तसेच विनंती अर्जांनाही दाद मिळत नसल्याने धानोरी-लोहगाव रहिवासी संघटनेतर्फे पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. या भागाची लोकसंख्या सुमारे पाच लाख आहे.

संघटनेचे अध्यक्ष गिरीश जैवळ म्हणाले, ‘‘या परिसरात सुमारे साडेचारशे सोसायट्या आहेत. सर्वांना टँकरनेच पाणी मागवावे लागते. अनेक मोठ्या सोसायट्यांना महिन्याला पाच ते सहा लाख रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक सभासदाला द्यावा लागणारा मासिक देखभाल खर्च बराच वाढला आहे.’’

आंदोलकांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्र यांना निवेदन देण्यात आले. आमच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले.

संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न पाटील म्हणाले, ‘‘एका मुलाला खड्ड्यात पडून २२ टाके पडले. पोरवाल रस्ता, भारत माता चौक, निरगुडी रस्ता, मैत्री पार्क अशा अनेक भागांतील बहुतेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात. रुग्णवाहिकेच्या मार्गातही अडथळे येतात, पण महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.