Video: विमानातून उडी घेतली, स्वतःचा जीव वाचवला अन् चालत निघाला! विमान अपघातातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल
esakal June 13, 2025 04:45 AM

Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते एका इमारतीवर कोसळलं. या विमानातून २४२ प्रवाशी प्रवास करत होते, त्यापैकी केवळ एकमेव प्रवाशी बचावल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रवाशानं विमानातून बाहेर उडी घेत आपला जीव वाचवलाच पण चक्क स्वतःच्या पायावर चालत तो निघाला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत काय?

रमेश विश्वकुमार असं या एकमेवर बचावलेल्या प्रवाशाचं नाव असून या विमानात त्याचा सीट नंबर 11A हा होता. त्याच्या बोर्डिंग पासवरुनही हे स्पष्ट झालं आहे. विमान अपघातानंतर सर्वत्र अपघाताची चर्चा सुरु असताना अचानक रमेश विश्वकुमार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत रमेश यांच्या चेहऱ्याला जखमा झालेल्या दिसत आहेत तसेच चेहरा सुजलेला आहे.

सहाजिकच इतक्या मोठ्या अपघातातून त्यांना जखमा झालेल्या असणार. विशेष म्हणजे रमेश हे स्वतःच्या पायानं रस्त्यावरुन चालत सुरक्षितस्थळी जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्याभोवती काही नागरिकांचा गराडा दिसतो आहे. यांपैकी एकजण त्यांना तुम्ही कोण आहात? असा प्रश्नही विचारत आहे. त्यावर प्लेनमधून उडी मारल्याचं काहीतरी ते सांगताना या व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.

विमानाच्या इतक्या भीषण अपघातानंतर एकमेव वाचलेला प्रवासी म्हणून सध्या सोशल मीडियावर रमेश विश्वकुमार यांची चर्चा आहे. त्यांच्याबाबतचा केवळ हा एकच व्हिडिओ सध्या माध्यमांकडं उपबल्ध आहे. पण उपचारांनंतर पोलीस जेव्हा त्यांचा जबाब नोंदवतील त्यानंतरच या विमान अपघाताबाबत आणि स्वतः रमेश विश्वकुमार यांच्याबाबत सविस्तर माहिती कळू शकेल. एकमेव वाचलेला प्रवाशी म्हणून विमानानं उड्डाण घेतल्यापासून ते क्रॅश होईपर्यंत नेमकं विमानात काय घडलं? याचं कोडंही उलगडू शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.