अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी होणार; अमेरिका, ब्रिटनची टीमही करणार मदत
BBC Marathi June 13, 2025 05:45 PM
Getty Images

अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाने या माहितीला दुजोरा दिला आहे.

एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते.

भारतीय वंशाचे एक ब्रिटीश प्रवासी या दुर्घटनेतून बचावले आहेत. विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव असून ते विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर होते, अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

हे विमान एअर इंडियाचे Flight AI171 होते. उड्डाणानंतर लगेचच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते.

या अपघातस्थळी अग्निशमन दलाची वाहनं, पोलीस तसेच मदतकार्य करणारी पथकं कार्यरत असून गुजरात सरकार आणि केंद्र सरकार मदतकार्य करत आहेत.

'केवळ एकच व्यक्ती वाचणं दुर्मिळ', तज्ज्ञ काय म्हणतात?

ब्रिटनचे विश्वास कुमार रमेश हे अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातातून बचावलेले एकमेव व्यक्ती आहेत.

"केवळ एकच माणूस वाचणं फारच दुर्मिळ आहे," क्रॅनफिल्ड विद्यापीठातील 'एव्हिएशन अॅन्ड द एन्व्हायर्नमेंट' विभागातील सहयोगी प्राध्यापक गाय ग्रॅटन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

BBC

त्यांनी म्हटलं, "आधुनिक प्रवासी विमाने अशी बनवलेली असतात की अपघात झाला तरी शक्य तितक्या अधिक लोकांचे प्राण वाचावेत."

"बहुतेक वेळा अशा अपघातांमध्ये खूप लोक वाचतात किंवा जर अपघात भीषण असेल, तर कोणीच वाचत नाही. पण फक्त एकच माणूस वाचणे फारच आश्चर्यकारक आहे."

ग्रॅटन यांनी विश्वास कसे बचावले असावेत याचा अंदाज व्यक्त करताना म्हटलं की, रमेश यांची 11A सीट अपघातात विमानातून दूर फेकली गेली असावी आणि ते त्या सीटवर बसलेले असावेत."

"ते खूप नशीबवान होते."

अपघातस्थळी फॉरेन्सिकची टीम PTI

अपघातस्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ दाखल झाले आहेत आणि अपघाताशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

आज (13 जून) विमानतळावर आणि तिकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदाबादला भेट

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादला भेट दिली आहे. आज (13 जून) सकाळी इथे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून अपघात स्थळाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी जवळपास 20 मिनिटं अपघात स्थळाला भेट दिली आणि त्यानंतर ते तिथून निघाले.

त्यांनी कोणतेही विधान केलं नाही आणि बहुतांश प्रसारमाध्यमांना या भेटीवेळी दूर ठेवण्यात आले होते.

PTI पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील हॉस्पिटलला भेट देताना

अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलकडे गेले. तिथे ते अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला भेटतील.

हे सध्या अहमदाबादमध्येच आहेत. त्यांनी मोदींच्या भेटीबद्दल माहिती देताना म्हटलं, "अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या खूप घडामोडी सुरू आहेत. पंतप्रधान तिथे पोहोचले होते. हे विमान विमानतळाजवळील डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. त्यावेळी जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी ते इथं आले आहेत."

"आपल्याला इतकं माहीत आहे की, विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे, पण इमारतीवर विमान आदळल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्यांची किंवा जखमींची अधिकृत संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही."

माध्यमांना रुग्णालयापासून काही मीटर अंतरावरच थांबवण्यात आले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं अरुणोदय मुखर्जींनी सांगितलं.

विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

गुरुवारी (12 जून) रात्री भारताने एअर इंडियाच्या अपघाताची अधिकृत चौकशी सुरू करण्याची घोषणा केली.

एअर इंडियाच्या अपघाताची अधिकृत चौकशी सुरू करणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किन्जारापु यांनी सांगितले की, भारताच्या विमान अपघात चौकशी ब्युरोने (Aircraft Accident Investigation Bureau) आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार चौकशी सुरू केली आहे.

Getty Images कोसळलेल्या विमानाचे अवशेष

किन्जारापु यांनी एक्सवर माहिती देताना म्हटलं की, सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करत आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. ही समिती संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करेल."

"ही समिती विमानवाहतुकीतील सुरक्षेची पातळी उंचावण्यावर आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यावर काम करेल," असंही त्यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे (FAA) क्रिस रोशेलो यांनी म्हटलं होतं की, एक तज्ज्ञांची टीम भारतात येत आहे, जी या अपघाताच्या चौकशी करण्यात मदत करणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनीही सांगितले की, त्यांची एक टीम गुजरातमध्ये पाठवण्यात आली आहे आणि ती या चौकशीत सहभागी होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.