India Weapons : भारताचे शस्त्रसामर्थ्य वाढणार! संरक्षण मंत्रालयाकडून दोन हजार कोटींच्या खरेदीला मान्यता
esakal June 25, 2025 06:45 AM

नवी दिल्ली - दहशतवादविरोधी मोहिमेची धार वाढविण्यासाठी संरक्षण साहित्याची आणखी खरेदी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. ड्रोन, रिमोटली पायलेटेड व्हेइकल, बॅलेस्टिक हेल्मेट, मध्यम आणि अवजड क्षमतेची लढाऊ वाहने, रायफल तसेच नाईट व्हिजन गॉगल, बुलेटप्रूफ जॅकेट्स यांची खरेदी केली जाणार असून यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे संरक्षण खात्याकडून सांगण्यात आले आहे.

आपत्कालीन खरेदी (ईपी) प्रक्रियेअंतर्गत वरील संरक्षण साहित्याच्या खरेदीसाठी १३ करार करण्यात आले आहेत. दहशतवाद विरोधी मोहिमेची तीव्रता वाढविण्यासाठी जलदगतीने या संरक्षण साहित्याची खरेदी केली जाईल. विशेष म्हणजे लष्कराने अलीकडेच ‘सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस’ कंपनीकडून ४५० ‘नागास्त्र-१-आर’ दारूगोळा लाँचर प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

‘नागास्त्र-१ आर’ ही पुन्हा वापरता येण्याजोगी लाँचर प्रणाली आहे. ही प्रणाली ३६० गिम्बल कॅमेऱ्याने सज्ज आहे. गरज भासली तर रात्रीच्या वेळी मोहीम राबविण्यासाठी यात थर्मल कॅमेरा बसविला जाऊ शकतो. व्हिडिओ तसेच टेलिमेट्री संपर्क प्रणालीशी ही लाँचर प्रणाली जोडली जाऊ शकते. लडाख तसेच झाशीजवळील बबिना येथे या प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती.

राजनाथ चीनमध्ये जाणार

‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) बुधवारी चीनमध्ये होत असलेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लडाखमध्ये २०२० मध्ये चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर पहिल्यांदा भारताचा प्रमुख नेता चीन भेटीवर गेला आहे, हे विशेष.

‘एससीओ’ बैठकीत सदस्य देशांदरम्यानचा व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. दरम्यान पुढील पिढीतील लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) आणि अमेरिकेच्या ‘जीई एअरोस्पेस’ या दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

या दोन्ही कंपन्या मिळून ‘एफ-४१४’ इंजिनाची निर्मिती करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच २०२३ मध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान याबाबतची घोषणा केली होती पण काही तांत्रिक कारणामुळे यात अडथळे निर्माण झाले होते. सध्या तंत्रज्ञान हस्तांतराच्या अनुषंगाने दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

हवाई दलास मिळणार सहा तेजस

नवी दिल्ली - हवाई दलाला मार्च-२०२६ पर्यंत सहा तेजस ही हलकी लढाऊ विमाने मिळतील, अशी माहिती हिंदुस्थान ॲरोनॉटिक्स लि.चे (एचएएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी.के. सुनील यांनी दिली. अमेरिकी कंपनी जीई एरोस्पेस वेळेवर ‘एफ-४०४’ इंजिन पुरवू न शकल्याने या विमानांना विलंब झाला, अशी कबुलीही त्यांनी दिली. या कंपनीकडून चालू आर्थिक वर्षात १२ इंजिने मिळण्याची अपेक्षा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.